Patroleum Minister Dharmendra Pradhan explains Fuel Hike
Patroleum Minister Dharmendra Pradhan explains Fuel Hike 
देश

...म्हणून सीता रावणाच्या देशापेक्षा रामाच्या देशात पेट्रोल महाग!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर देशात आजवरच्या सर्वाधिक उच्च पातळीवर आहेत, हा दुष्प्रचार असल्याचे सांगत सरकारने वस्तुस्थिती अशी नसल्याचा दावा आज राज्यसभेत केला. सीतेचा देश नेपाळ व रावणाच्या श्रीलंकेतही पेट्रोल डिझेल स्वस्त मिळत असेल तर रामाच्या भारतात ते का नाही ? या उपरोधिक प्रश्‍नाला पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, दोन्ही देशांसह अनेक शेजारी देशांत पेट्रोल-डिझेल-केरोसीन फक्त जमीनदारांना व श्रीमंतांनाच विकले जाते. भारतात ते सर्व जनतेसाठी खुले आहे त्यामुळे दरांतील चढउतारही पारदर्शक पध्दतीने सर्वांसमोर येतात असे सांगितले.

प्रश्‍नोत्तर काळात या मुद्यावरून कॉंग्रेसचे के सी वेणुगोपाल व प्रधान यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. वेणुगोपाल हे मूळ मुद्दा सोडून राजकीय गोष्टी बोलू लागताच सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना तेथल्या तेथेच थांबविले. पेट्रोलमध्ये प्रती लीटर 30 पैसे व डिझेलमध्ये 25 पैसे प्रतीलीटर दरवाढ झाल्यावर आज दिल्लीत पेट्रोलच्या नव्या किमती दिल्लीत 87.60 रुपये प्रति लीटर व मुंबईत 94.12 रुपये प्रति लीटर झाली. डिझेलच्या किमती अनुक्रमे 77.73 रुपये प्रति लीटर व 84.63 रुपये इतक्‍या वाढल्या आहेत. याच मुद्यावर राज्यसभेत प्रश्‍नोत्तर तासादरम्यान कॉंग्रेस व सत्तारूढ सदस्यांत शाब्दीक चकमकीही झडल्या.

समाजवादी पक्षाचे खासदार विश्‍वंभर प्रसाद निषाद यांनी, सीता व रावणाच्या देशांतील पेट्रोलियम दरांशी भारतातील दरांची तुलना करून भारतातही हे दर कधी खाली आणणार? असे विचारताच उसळलेल्या हास्यकल्लोळात प्रधान यांनीही प्रश्‍नाला दाद दिली. मात्र दोन्ही बाजूंमध्ये तेल वितरण प्रणालीत मोठा व मुलभूत फरक असल्याचेही सांगितले. 

आर्थिक बाबतीत भारताला या देशांशी तुलना करायची आहे की विकसित व समृध्द देशांबरोबर ? असे विचारून प्रधान म्हणाले की पेट्रोलियम पदार्थांच्या किमती रोजच्या रोज बदलण्याची प्रथा 2014 नंतर सुरू झाली. मागील 300 दिवसांत 60 दिवस पेट्रोलियम दरांत वाढ झाली. त्याच वेळी 28 दिवस (पेट्रोल 7 व डिझेल 21 दिवस) हे दर कमीही झाले होते. सुमारे 250 दिवस दरांत कोणतेही बदल झालेले नाही. या पदार्थांचे दर वाढतात त्यामागे जसे केंद्राने उत्पादन शुल्कात वाढ केलेली असते तसेच संबंधित राज्यांनी वाढविलेला मूल्यवर्धीत कराचाही (व्हॅट) त्यात तेवढाच वाटा असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चया तेलाच्या किमती सांकेतिक असतात पण त्याचे तेथील प्रत्यक्ष उत्पादन हे मानक असते.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT