petroleum minister hardeep singh puri holds talks with saudi counterpart
petroleum minister hardeep singh puri holds talks with saudi counterpart 
देश

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? नवीन पेट्रोलियम मंत्र्यांचा थेट सौदीच्या युवराजांना फोन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल दरात वाढ करण्यात आली आहे. यावरुन विरोधक केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करीत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी थेट सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) युवराजांना फोन केल्याचे समोर आले आहे.  

भारताचा हा खनिज तेलाचा जगातील मोठा आयातदार देश आहे. खनिज तेलाच्या दरवाढीचा भारताला मोठा फटका बसत आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी वाढत्या किमतीबद्दल चर्चा केली आहे. याचबरोबर त्यांनी याविषयी संघटनेकडे चिंता व्यक्त केली आहे. 'ओपेक'च्या प्रमुख सदस्य देशांशी फोनवरुन चर्चा करुन रास्त भावाने खनिज तेलाचा पुरवठा व्हावा, यासाठी पुरी यांनी मोहीम उघडली आहे. 

कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या पेट्रोलियम मंत्र्यांशी पुरी यांनी आधी फोनवर चर्चा केली. नंतर त्यांनी 'ओपेक'मधील सर्वांत महत्वाचा सदस्य असलेल्या सौदी अरेबियाशी फोनवर चर्चा केली. सौदी अरेबियाचे युवराज व तेथील पेट्रोलियम मंत्री अब्दुल अजीज बिन सलमान अल सौद यांच्याशी पुरींनी चर्चा केली. दोन्ही देशांतील द्वीपक्षीय भागीदारी वाढवण्यासोबत खनिज तेलाच्या वाढत्या भावाबद्दल त्यांच्यात चर्चा झाली. पेट्रोलियम मंत्र्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, महिन्यात 17 दिवसांत 10 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे वाढ करण्यात आली.  डिझेलचे दरात आज कोणतेही बदल करण्या आलेले नाहीत. सध्या देशात इंधनाचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.54 रुपये तर मुंबई 107.54 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.87 रुपये आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT