plea in supreme court against delhi police action about narendra modi posters
plea in supreme court against delhi police action about narendra modi posters 
देश

मोदींच्या पोस्टरचा वाद...सर्वोच्च न्यायालयात अभिव्यक्तीसह भाषण स्वातंत्र्याचा मुद्दा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) संकटाच्या हाताळणीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपचे सरकार (BJP government) टीकेचे धनी बनले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या विरोधात पोस्टर लावणाऱ्या 24 जणांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे पोस्टर शेअर करुन थेट सरकारला आव्हान दिले होते. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court) पोचला आहे. 

मागील काही दिवसांत दिल्लीत अनेक ठिकाणी मोदींवर टीका करणारी पोस्टर लावण्याचे सत्र सुरू आहे. कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका देशात तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. दिल्लीत अशा प्रकारची पोस्टर लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाईची पावले उचलली. 

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेक एफआयआर दाखल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात कारवाई करीत आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 800 पोस्टर जप्त केली आहेत. या पोस्टरवर लिहिले होते की, मोदीजी, आपने हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दी? 

यावर राहुल गांधींना सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर करीत मोदी सरकारला कारवाई करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. या पोस्टरवरुन सुरू झालेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. प्रदीप कुमार यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली असून, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करु नयेत आणि पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करु नये, यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT