Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे वर्गमित्र असल्याचा दावा करणारे ८१ वर्षीय असगरअली वोरा यांना जमीन वादाच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांतच भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. वोरा यांच्याविरोधात यापूर्वी दाखल केलेली तक्रार मागे घेत असल्याचेही त्यांनी पोलिसांना कळवले आहे. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने तडजोड झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भाईंदर पूर्वेतील नवघर परिसरातील जमिनीवरून हा वाद सुरू होता. असगरअली वोरा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यायाची विनंती केली होती. वोरा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी १९८९ मध्ये नवघर परिसरात सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन कायदेशीर नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केली होती.
असगरअली वोरा यांनी गुजरातमधील वडनगर येथील बी. एन. हायस्कूलमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे. ८ सप्टेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाईंदरमधील जमिनीच्या वादाची माहिती दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा वोरा यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. पंतप्रधान आपल्या बालपणीच्या मित्राला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
वोरा यांच्या माहितीनुसार, २०११ च्या सुमारास ‘स्वयम बिल्डर्स’ आणि स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ यांनी त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जमीन दोन भागांत दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी मंत्रालयात या प्रकरणावर विशेष बैठक बोलावली. या बैठकीला असगरअली वोरा, नरेंद्र मेहता, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त तसेच नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नरेंद्र मेहता यांनी नगररचना विभागाला अधिकृत पत्र दिले. त्याद्वारे त्यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्या जागेवरील बांधकामासाठी मिळालेल्या सर्व मंजुरी आणि परवानग्या महापालिकेकडे सरेंडर केल्या.
याशिवाय, मेहता यांनी पोलिसांना स्वतंत्र पत्र देत असगरअली वोरा यांच्याविरोधात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे कळवले. दोन्ही पक्षांमध्ये आपापसांत सामंजस्याने तडजोड झाल्याचेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.