Modi Breaks Nehru Record NEWS Sarkarnama
देश

PM Modi: मोदी रचणार नवा इतिहास; नेहरूंचा 72 वर्षांचा विक्रम मोडणार

Modi Breaks Nehru Record: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून 2026 रोजी जवाहरलाल नेहरूंचा 4,397 दिवसांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरणार आहेत.

Mangesh Mahale

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला 9 जून 2026 रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी मोदी स्वतंत्र भारतातील निवडून आलेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक काळ सलग पदावर राहण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. या कामगिरीनंतर 10 जून रोजी होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींच्या गौरवार्थ अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू मांडणार आहेत. एनडीएतील सर्व मित्रपक्ष त्याला पाठिंबा देणार आहेत. ठरावामध्ये मोदी यांच्या गेल्या बारा वर्षांतील नेतृत्व, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि राजकीय कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

स्वतंत्र भारतातील पहिले निवडून आलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १३ मे १९५२ रोजी पदाची शपथ घेतली होती. त्यांनी सलग ४,३९७ दिवस देशाचे नेतृत्व केले. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. ९ जून २०२६ रोजी त्यांचा कार्यकाळ ४,३९८ दिवसांचा होणार असून, ते नेहरूंचा विक्रम मागे टाकतील.

पण, एकूण पंतप्रधान कार्यकाळाच्या बाबतीत नेहरू यांचे स्थान अद्याप अव्वल आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान बनले आणि २७ मे १९६४ रोजी त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी पद सांभाळले. त्यामुळे त्यांचा एकूण कार्यकाळ ६,१३० दिवसांचा ठरतो. यामध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अंतरिम सरकारच्या नेतृत्वाचाही समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते म्हणून ते आधीच इतिहासात नोंदले गेले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळही मागे टाकला आहे. तसेच सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून केंद्रात सरकार स्थापन करणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.

मोदी यांचा प्रशासकीय प्रवास ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झाला. २२ मे २०१४ पर्यंत त्यांनी गुजरातचे नेतृत्व केले आणि त्यानंतर २६ मे २०१४ पासून ते देशाचे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवरील कार्यकाळ एकत्रित विचारात घेतल्यास त्यांनी निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नऊ हजार दिवसांहून अधिक काळ पूर्ण केला आहे. त्यामुळे भारतीय राजकारणातील सर्वाधिक दीर्घकाळ प्रभावी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT