NDA MPs meeting Sarkarnama
देश

NDA MPs meeting : संजय जाधव, सायोनी घोष पहिल्या रांगेत; PM मोदी म्हणाले, काळजी नको... ते काहीही म्हणोत, मी तुमच्यासोबत...

PM Modi, breakfast meeting, Sanjay Jadhav : एनडीएतील खासदारांसोबत चहापानात मोदींचा संवाद; अपात्रतेच्या भीतीवर दिलासा देत ‘मी तुमच्यासोबत आहे’ असा विश्वास.

Rajanand More

PM Narendra Modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी 'एनडीए'तील काही खासदार भेटले. सकाळी पंतप्रधानांनी या खासदारांसोबत चहापान केले. मात्र, ही भेट तेवढ्यापुरतीच मर्यादीत नव्हती. या चहापानाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले सहा आणि तृणमूल काँग्रेसमधून एनसीपीआयमध्ये गेलेल्या २० बंडखोर खासदारांनीही हजेरी लावल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

चहापानादरम्यान पंतप्रधान मोदींनी खासदारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींसमोरील पहिल्या रांगेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार संजय जाधव, पार्थ पवार, सायोनी घोष, काकोली घोष आदी खासदार होते. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे हे दुसऱ्या रांगेत, नागेश आष्टीकर हे तिसऱ्या आणि संजय दिना पाटील हे चौथ्या रांगेत होते.

संजय जाधव यांना पहिल्या रांगेत स्थान मिळाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. सध्या दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असून संजय जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याची सांगितले जाते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी खासदारांसोबतच्या संवादात विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. अपात्रतेच्या मुद्द्यावरही त्यांनी या खासदारांना निश्चिंत राहा, असा संदेश दिल्याचे वृत्त 'न्यूज १८'ने दिले आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील मतदारांकडून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवरही पंतप्रधानांनी चिंता करू नका असे सांगत आपआपल्या भागात सक्रीय होण्यास सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.

पहिल्यांदाच एनडीएसोबत आलेल्या या खासदारांना उद्देशून पंतप्रधान मोदी यांनी आश्वस्त केले. तुमच्याविषयी काय बोलले जातेय, याबाबत काळजी करू नका. मी तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी या खासदारांना सांगितल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेसह तृणमूलच्या बंडखोर खासदारांविषयी विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. सोशल मीडियातूनही त्यांना ट्रोल केले जाते. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या खासदारांना सल्ला दिला आहे. तसेच, विकासकामांबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.

ओमराजेंचा योगाभ्यास

काही खासदारांनी या भेटीची संधी साधत पंतप्रधानांकडे आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबत निवेदनही दिले. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही निवेदन दिल्याची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. संवादादरम्यान पंतप्रधानांनी माझ्या नियमित योगाभ्यासाबद्दलही आपुलकीने विचारपूस करून त्याविषयी माहिती जाणून घेतल्याचे ओमराजेंनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT