PM Narendra Modi 
देश

PM Narendra Modi: गुजरात निवडणुकीतील विजय कोणामुळे? पंतप्रधानांनी स्पष्टचं सांगितलं...

गुजरात विजयानंतर प्रथमच भाजप संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

PM Narendra Modi : आपण आज त्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले पाहिजे ज्यांच्या अथक परिश्रमामुळे गुजरात पक्ष संघटनेत इतके काम झाले. गुजरातमध्ये पक्षाने पुन्हा विजय मिळवला तर त्यामागे संघटनेची ताकद आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. गुजरात निवडणुकीनंतर संसदेच्या ग्रंथालयातील बालयोगी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याशिवाय पंतप्रधानांनी पाटील आणि नड्डा यांचे विशेष अभिनंदन त्यांनी केले. मोदी म्हणाले की संघटना बळकट करण्याच्या बळावरच कोणताही पक्ष एखाद्या राज्यात इतका सलगपणे जिंकू शकतो. कार्यकर्त्यांनी पक्षाची चांगली कामे लोकांपर्यंत नेली, त्यामुळेच गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपचे सरकार आले. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष निवडणुका जिंकू शकतो, गुजरातमधील विजय हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान यावेळी, स्वागत है भाई स्वागत है, मोदी जी का स्वागत है...भाजप खासदारांच्या या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वार्थाने विक्रमी विजयाचे शिल्पकार ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सत्तारूढ खासदारांनी वरील घोषणांनी स्वागत-अभिनंदन केले. हा विजय खऱ्या अर्थाने गुजरातेतील भाजप कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे, असे काम सातत्याने केले तर आशीर्वाद मिळतोच, अशी भावना व्यक्त केली. भारताला यजमानपद मिळालेल्या जी - २० परिषदेच्या पूर्वतयारी बाबतही मोदींनी सत्तारूढ खासदारांना विशेष टिप्स दिल्या.

गुजरात विजयानंतर प्रथमच भाजप संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजप संसदीय पक्षाचे प्रभारी व्ही सतीश, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सी आर पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे चीनने पुन्हा भारताची कुरापत काढल्याचा प्रकार उघडकीला आल्याच्या व विरोधकांनी त्यावरून संसदेतील वातावरण तापविण्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत स्वागताचा व उत्साहाचा `टोन` विचारपूर्वक कमी ठेवण्यात आल्याचे दिसत होते.

पंतप्रधान मोदी यांनी भारतात हू घातलेल्या जी – 20 परिषदेच्या तयारीचाही उल्लेख केला. पूर्वतयारीच्या प्रक्रियेत भाजपच्या सर्व खासदारांना एकत्र येण्याचे आणि त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही परिषद म्हणजे भाजप, सरकार आणि पंतप्रधानांचा कार्यक्रम नाही. हा भारताचा कार्यक्रम आहे. तो यशस्वी करण्यासाठी सर्व खासदारांनी मेहनत घ्यावी, सर्वांचा सहभाग त्यात असावा. ज्या शहरात G-२० तयारी व स्वागताचे कार्यक्रम आयोजित केला जातील तेथे लोकांना जास्तीत जास्त सहभागी करून स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे, परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले पाहिजे, तसेच ज्या शहरात हे कार्यक्रम होतील तिथे रांगोळी काढावी आणि दिवे प्रज्वलित करून आपण पाहुण्यांचे स्वागत करूयात.

अर्थव्यवस्थेवर रेल्वेमंत्र्यांचे सादरीकरण !

आजच्या बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर सादरीकरण करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नव्हे तर रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांना त्यासाठी मोदी यांनी संधी दिली. रेल्वे मंत्रालयात आपल्या सौम्य स्वभावाने वैष्णव जे मोठे बदल घडवून आणत आहेत ते पीएमओ व पंतप्रधानांच्या पसंतीला उतरत असल्याचे निरीक्षण मांडले जाते. अलीकडे संसदेत सातत्याने मूड खराब होऊन विरोधकांवर डाफरणाऱया सीतारामन यांच्यासाठी ही सूचक घटना असल्याचे मत भाजप खासदारांनी खासगीत व्यक्त केले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत वैष्णव यांनी जे अर्थव्यवस्थेवर सादरीकरण केले त्यात भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन कसे आले आहेत याचे चित्र त्यांनी मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT