Winter Session : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. यानंतर धनखड यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून पंतप्रधान मोदींचा लोकसभेतील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे.
आपली नक्कल करून विरोधकांनी अपमान केल्याने खूप दु:ख झाल्याची भावना धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना फोन केला. मागील 20 वर्षांपासून आपला अपमान होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटल्याचे धनखड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. नक्कल प्रकरणात भाजपकडून (BJP) याविरोधात देशभरात आंदोलन केले जाणार आहे.
भाजपकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना 'इंडिया' आघाडीतील काही नेत्यांकडून पंतप्रधान मोदींच्या 2018 मधील लोकसभेतील भाषणाचा काही भाग व्हायरल केला जात आहे. यामध्ये पंतप्रधानांकडून विरोधकांची नक्कल केल्याचा दावा करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘मिमिक्री ही मास्टरकडून केली जाणारी कला आहे’, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोईत्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांना उद्देशून हातवारे करताना दिसत आहेत. कल्याण बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींकडून मिमिक्री केली जात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, मिमिक्री ही कला आहे. मला धनखड यांच्याविषयी खूप आदर आहे. ते माझ्या व्यवसायाशी संबंधित आहेत. ते आमचे माजी राज्यपाल आहेत. ते आपले उपराष्ट्रपती आहेत. मी फक्त एक कला सादर केली. पंतप्रधान मोदींनीही यापूर्वी लोकसभेत मिमिक्री केली आहे. मी हे तुम्हाला दाखवू शकतो. पण आम्ही ते फारसे गांभीर्याने घेतले नाही.
दरम्यान, भाजपकडून मिमिक्री प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. विरोधकांनी धनखड यांचाच अपमान केला नाही तर हा शेतकरी, ओबीसी, जाट समाजाचा अपमान असल्याची टीका नेत्यांनी केली आहे. धनखड हे उपराष्ट्रपती असून या पदावरील व्यक्तीचा अपमान करून विरोधकांनी मोठी चूक केली आहे. त्याचा तीव्र निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिली जात आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.