PM Narendra Modi

 

Sarkarnama

देश

पंजाबमध्ये पाऊल पडताच पंतप्रधान मोदींवर ओढवली नामुष्की

शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी पहिल्यांदाच पंजाब दौऱ्यावर आले होते.

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : तीन कृषी कायद्यांच्या (Farm Laws) विरोधी आंदोलनामुळे पंजाबसह (Punjab) इतर काही राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये (Farmers) केंद्र सरकारविरोधात रोष आहे. त्याचा फटका बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बसल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी बुधवारी पहिल्यांदाच पंजाबमध्ये पाऊल टाकले होते. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन केले जाणार होते. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यातच अडवल्याने हा कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधील फिरोझपूर (Firozpur) येथे भेट देणार होते. दुपारी दीड वाजता तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला ठेवणार होते. त्यासाठी पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये दाखल झाले. भटिंडा येथून त्यांच्या वाहनांचा ताफा फिरोझपूरच्या दिशेने निघाला होता. पण मार्गावरील एका पुलावर शेतकऱ्यांच्या मोठा जमाव थांबला होता.

या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जवळपास 20 मिनिटे हा ताफा मार्गावरच थांबून राहिला. पण आंदोलक शेतकरी जागेवर न हलल्याने पंतप्रधान मोदी फिरोझपूरला न जाता थेट विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. मागील काही दिवसांत उत्तर प्रदेशसह विधानसभा निवडणूक असलेल्या इतर राज्यांमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम होत आहेत. पंजाबमध्येही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता. हा कार्यक्रम रद्द करावा लागल्याने वाद निर्माण झाला आहे.

पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करावा लागल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी काँग्रेस (Congress) सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील पोलिसांना सभेला येण्यापासून रोखण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांशी हातमिळवणी करत मोठ्या संख्येने बस अडकवून ठेवल्या होत्या. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी यातून मार्ग काढण्यास थेट नकार दिला. काँग्रेस सरकारचा हा प्रयत्न लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासणारा असल्याची टीका नड्डा यांनी केली आहे.

दरम्यान, फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून आज विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग, अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण, मुकेरीयन-तलवारा दरम्यान नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथे पीजीआय सॅटेलाईट केंद्र उभारणी तसेच कपूरथला आणि होशियारपूर यथे दोन वैद्यकीय विद्यापीठांची स्थापना करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

देशाच्या सर्व भागांमध्ये संपर्क सुविधा सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या अखंडीत प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये विविध राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. परिणामी, पंजाब राज्यात 2014 साली 1700 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते त्यात दुपटीने वाढ होऊन 2021 साली राज्यात 4100 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. याच प्रयत्नांचा पुढील भाग म्हणून, पंजाबमधील दोन प्रमुख रस्ते मार्गिकांच्या कामाची कोनशीला ठेवली जाणार आहे. या कामांमुळे, पंजाबमधील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर पोहोचण्याच्या सुलभतेत वाढ करण्याची पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT