Prashant Kishor, Congress
Prashant Kishor, Congress Sarkarnama
देश

माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे बारा आमदार फुटले अन् मास्टरमाईंड प्रशांत किशोर!

सरकारनामा ब्युरो

शिलाँग : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मेघालयमध्ये काँग्रेसवर (Congress) पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangama) यांच्यासह काँग्रेसच्या १२ आमदारांना त्यांनी फोडलं आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या भूकंपामागचे मास्टरमाईंड प्रशांत किशोर (Prashant Kishor) असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि त्यांची टीम मेघालयातील काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते. मात्र याआधी संगमा यांनी तृणमूल काँग्रेसला कोणताही शब्द दिला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संगमा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले होते.

संगमा यांना फोडण्याची जबाबदारी तृणमूल काँग्रेसनेच किशोर यांच्या संस्थेला दिल्याची चर्चा आधीपासूनच होती. गोव्यातील माजी मुख्यमंत्र्यांना फोडल्यानंतर आता मेघालयातील माजी मुख्यमंत्र्यांसाठी तृणमूलने फासे टाकले होते. प्रशांत किशोर हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममतांसोबत होते. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर गोवा, त्रिपुरासह मेघालय व इतर राज्यांमध्ये काँग्रेला हादरे देण्यातही त्यांचाच हात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मागील काही महिन्यांत प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या जवळ गेल्याचे बोलले जात होते. ते काही महिने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या राजकीय सल्लागारही होते. मागील काही महिन्यांत त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींही राहुल गांधी यांचीही भेट घेतली. त्यामुळे ते काँग्रेसवासी होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यानंतर त्यांचा सूर एकदम बदलला. राहुल गांधींसह त्यांनी अनेकदा काँग्रेसवर थेट टीका केली.

आता ते ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत असल्याची चर्चा आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना फोडण्यात त्यांचीच मोठी भूमिका होती, हे स्पष्ट झालं आहे. आता मेघालयमध्येही त्यांनी भूकंप घडवून आणत काँग्रेसला झटका दिला आहे. मागील काही महिन्यांत काँग्रेसमधील अनेक नेते तृणमूलमध्ये दाखल होत आहेत. याबाबत किशोर यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT