Navjot Singh Sidhu Sarkarnama
देश

सिद्धूंची झोळी रिकामीच! काँग्रेसने ठरवला मुख्यमंत्री पदाचा चेहरा

punbaj election 2022 : हायकमांडने सिद्धू यांच्या डोक्यावरील हात हटवला

सरकारनामा ब्युरो

अमृतसर : निवडणूक तोंडावर असतानाही पंजाब काँग्रेसमधील सत्तासंघर्षाचा अंतर्गत वाद अजूनही सुरुच आहेत. आधी कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि आता मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू असा वाद रंगला आहे. अशाच वादात आता हायकमांडनी सिद्धू यांच्या डोक्यावरील हात हटवून मुख्यमंत्री पदासाठी चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिद्धू यांची झोळी पुन्हा रिकामीच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन एक ३६ सेकंदचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात अभिनेता सोनु सुद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री कसा असावा असे सांगत आहेत, यातून सध्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हेच पंजाब निवडणुकीसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अधिकृतपणे नसले तरी चरणजीतसिंग चन्नी हेच निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला जावा यासाठी सिद्धू आणि चन्नी हे दोघेही आग्रही होते. मात्र सिद्धू आणि चन्नी वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कोणताही एक पक्ष घेण्यासाठी काहीसा तळ्यात-मळ्यात होता. मात्र आता सोनु सुद यांच्या व्हिडिओमधून काँग्रेसने चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे. संपुर्ण व्हिडिओमध्ये चन्नी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही नेता दिसून येत नाही. इतकचं नाही तर सिद्धू यांचा साधा उल्लेख देखील या व्हिडिओमध्ये नाही. पंजाब काँग्रेसने देखील हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

पंजाब निवडणुकीच्या तारखेत बदल :

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख पुढे ढकलली आहे. रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार आता हे मतदान २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान ६ दिवसांनी पुढे गेल्याने राजकीय पक्षांनाही अधिक वेळ मिळणार आहे. निवडणुकीच्या इतर वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मतमोजणीही १० मार्च रोजीही होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT