Pune Loksabha Seat : Muralidhar Mohol News : Sarkarnama
देश

Pune Loksabha Seat : मुरलीधर मोहोळ हेच पुणे लोकसभेचे उमेदवार; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे सूचक विधान !

Muralidhar Mohol News : मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख !

Chetan Zadpe

Pune News : भारतीय जनता पार्टीकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाजपने नुकतीच लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूकप्रमुख म्हणून भाजपचे नेते व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड केली आहे. यामुळे पुणे लोकसभेसाठी मोहोळ यांच्या नाववर भाजपने अप्रत्यकपणे शिक्कामोर्तब केलंय का? अशी चर्चा होत होती. याच अनुषंगाने आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

‘सरकारनामा’च्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत बावनकुळे यांनी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुणे लोकसभेच्या अनुषंगानेही मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर बावनकुळेंनी अप्रत्यक्षपणे सूचक भाष्य केले आहे.

बावनकुळे म्हणाले, "पुणे लोकसभेत माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख आहेत. आमच्या राज्यस्तरीय बैठकीत म्हणजे मी असेन, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असतील आमच्या टीमसोबत मोहोळ असतात. मुरलीधर मोहोळ हे शहराचे महापौर राहिलेले आहेत. ५१ टक्के मतदान मिळवण्याचे हे आमचे लक्ष्य आहे. ५१ टक्के लोकांचा पाठिंबा कोणता चेहरा देवू शकतो, तर पुण्यात तो चेहरा मुरलीधर मोहाळांचा आहे, असे बावनकुळे म्हणाले. यामुळे आता पुणे लोकसभेसाठी मोहोळ भाजपचे उमेदवार असतील का? या चर्चेला जोर मिळाला आहे."

५१ टक्के मतदानाचं लक्ष -

"मतदान करणाऱ्या एकूण मतदारांपैकी ५१ टक्के लोकांचा पाठिंबा मिळविण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ज्या पद्धतीने आमच्या पक्षाची यंत्रणा काम करीत आहे. त्यानुसार हे ‘टार्गेट’ अशक्य नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्य आणि केंद्रातील सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. लोकांच्या हिताची अनेक कामं होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका मोठ्या ताकदीने आणि केलेल्या कामाचा जोरावर लढवणार आहोत. त्यामुळे ५१ टक्केंच ‘टार्गेट’ अवघड नाही, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

गडकरी-फडणवीस पक्षाचा एकच गट -

बावनकुळे हे नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात. या संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘खरंतर एखादा नेता, एखाद्या कार्यकर्त्याला मोठा करतो. तेव्हा निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याचं वलय असतं. गडकरींनी माझ्यासारख्या कार्यकर्याला पक्षात आणलं. मला नेता बनवलं, जिल्ह्याच्या राजकारणात आणलं, आमदार बनंवलं, त्यांनी आपली सावली आम्हाला दिली.

नितीनजी आमचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते तयार झाले, त्यांनी मला मंत्रिपदाची धुरा दिली. आम्ही कधीही गटातटात अडकलो नाही. आम्ही माणसांमध्ये राहतो, मिसळतो. खरंतर आम्ही पक्षीय विचारात अडकलो आहोत. नागपुरात गडकरी व फडणवीस मोठे नेते आहेत. त्या दोघांमधला मी ‘ॲक्सल’ आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT