BJP Sarkarnama
देश

BJP AI Video : शुध्दलेखनातील चूक अन् थेट मुख्यमंत्र्यांच्या थोबाडीत..! विरोधकांना घेरण्याच्या नादात भाजपने 'लाईन क्रॉस' केली अन् ओढविली नामुष्की

Punjab BJP, Bhagwant Mann, Bhagwant Mann AI video : भाजपला हा व्हिडिओ सोशल मीडियातून डिलिट करावा लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ भाजपची डोकेदुखी वाढविणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

Rajanand More

Punjab BJP AI Video : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नुकतीच पक्षाची नवी आयटी टीम सज्ज केली आहे. या टीमकडून अत्यंत आक्रमकतेने काम सुरू करत विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विविध चित्रपटांतील काही दृश्यांचा वापर केला जात आहे. AI च्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडियात पोस्ट केले जात आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर भाजपच्या आयटी सेलकडून निशाणा साधला जात आहे.

विविध राज्यांमधील भाजपच्या आयटी सेलकडून स्थानिक मुद्द्यांवरून राजकारण तापवले जात आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना टार्गेट केले जात आहे. शाळांमधील एका इंग्रजी फलकावरील शुध्दलेखनाच्या चुकीवर असाच एक व्हिडिओ तयार करण्यात आला. या व्हिडिओत थेट मान यांच्या थोबाडीत मारल्याचे दाखविण्यात आले आहे.

थेट मुख्यमंत्र्‍यांच्या थोबाडीत मारल्याच्या या व्हिडिओवरून प्रचंड वाद निर्माण झाला. आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांसह सोशल मीडियात या व्हिडिओवर टीका झाली. त्यानंतर पंजाब भाजपला हा व्हिडिओ सोशल मीडियातून डिलिट करावा लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ भाजपची डोकेदुखी वाढविणारा ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपने व्हिडिओ डिलिट केला असला तरी तो अनेकांनी डाऊनलोड केल्याने सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील एका शाळेत भाज्यांची माहिती असलेल्या फलकाचा फोटो व्हायरल झाला होता. या फलकावर इंग्रजीत 'Vegitables' असे लिहिले होते. त्यावरून आप सरकारवर टीका झाली होती. त्यावरच भाजपच्या आयटी सेलने एआय च्या माध्यमातून व्हिडिओ तयार केला आहे.

वर्गात एक शिक्षक विद्यार्थ्यांना फलकावरील स्पेलिंग आहे तसे लिहिण्यास सांगतात. तेवढ्यात तिथे भगवंत मान व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पाठोपाठ एक पालक आल्याचे दिसते. वहीत लिहिलेला 'Vegitables' हा शब्द पाहून पालक संतापतात आणि थेट मान यांच्या थोबाडीत मारतात, असे व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने यावरून भाजप शीखविरोधी असल्याची टीका केली आहे. तसेच भाजप हिंसेला प्रवृत्त करत असल्याचेही म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT