Election voting
Election voting Sarkarnama 
देश

विधानसभा निवडणुका पुढे ढकलणार? मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पुढील दोन महिन्यांत देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) होत आहेत. देशात कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट आली असतानाही निवडणूक आयोगाने (Election Commission) नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याची भूमिका घेतली आहे. आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे. गुरु रविदास यांची जयंती 16 जानेवारीला आहे. राज्यातील 32 टक्के जनता अनुसूचित जातींमधील आहे. या समाजातील काही प्रतिनिधींनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. रविदास जयंतीला राज्यातून लाखो भाविक उत्तर प्रदेशातील बनारसला 10 ते 16 फेब्रुवारीदरम्यान जातात. यामुळे या समाजातील लोक मतदान करू शकणार नाहीत. याचा विचार करून मतदान सहा दिवस पुढे ढकलावे.

राज्यातील मतदान सहा दिवस पुढे ढकलणे हे योग्य ठरेल. कारण यामुळे २० लाख नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे चन्नींनी नमूद केले आहे. याआधी बहुजन समाज पक्षाचे पंजाब प्रदेशाध्यक्ष जसवीरसिंग गडी यांनीही आयोगाकडे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मतदान 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला घ्यावे, असे म्हटले होते. आता यावर आयोग काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.

देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच निवडणुकांची रणधुमाळी सुरूअसल्याने चिंता व्यक्त होत आहे. यामुळे आयोगाने उत्तर प्रदेशात राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. त्यावेळी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्यास विरोध केला होता. यामुळे आयोगाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत तर, पंजाब, उत्तराखंड, गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होईल.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

पंजाब निवडणूक

मतदान - 14 फेब्रुवारी

मतमोजणी - 10 मार्च

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT