Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala  Sarkarnama
देश

सिद्धू मूसेवालाची हत्या का झाली? अखेर कारण आलं समोर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिद्धूच्या हत्येबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच त्यांच्या हत्येमागे गँगवॉर हेच कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याचबरोर मागील वर्षी अकाली दलाच्या तरुण नेत्याची हत्येचही कनेक्शन असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. (Sidhu Moose Wala News Updates)

विक्रमजितसिंह ऊर्फ विकी मिड्डुखेरा याची मागील वर्षी 7 ऑगस्टला हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात सिद्धूचा मॅनेजर शगुनप्रीतसिंग याचे नाव आले होते. त्याने कौशल गँगला सुपारी देऊन ही हत्या केल्याची चर्चा सुरू होती. यानंतर तो ऑस्ट्रेलियाला पळून गेला. या हत्येचा सूड उगवण्यासाठी सिद्धूची हत्या करण्यात आली. हा प्रकार दोन गँगमधील वादातून झाला आहे. यामागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

याचबरोबर कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार यानेही या हत्येची जबाबदारी सोशल मीडियावर पोस्ट करुन घेतली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँग आणि तो स्वत: या हत्येमागे असल्याचं गोल्डीनं म्हटलं आहे. विकी मिड्डुखेराच्या हत्या प्रकरणात सिद्धूचे नावही होते, असा दावाही त्यानं केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, आमचा भाऊ विक्रमजितसिंग मिड्डुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येत मूसेवालाचे नाव समोर आले होते. परंतु, पंजाब पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याचबरोबर आमचा सहकारी अंकित भादू याच्या एन्काउंटरमागेही मूसेवालाचा हात असल्याचं आम्हाला समजलं होतं. मूसेवाला हा आमच्या विरोधात काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं. सिद्धूबरोबर असलेले दोन जण जखमी असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सिद्धू मूसेवाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला पक्षात आणण्यामागे नवज्योतसिंग सिद्धू यांचा हात होता. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा होता आणि त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याच्यावर अनके गुन्हे दाखल होते. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल होते. त्याचे मूळगाव मानसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढला होता. त्याचा आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT