Pushkar Singh Dhami Sarkarnama
देश

राज्यपाल कोश्यारी यांच्या शिष्यानं आठ महिन्यांतच मोदींचं मन जिंकलं!

सरकारनामा ब्युरो

डेहराडून : उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) भाजपच्या मुख्यमंत्र्यांचाच पराभव झाल्याने मोठी नामुष्की ओढावली. गड आला पण सिंह गेला अशी पक्षाची अवस्था झाली. अखेर पराभव होऊनही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे शिष्य आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. मुख्यमंत्री म्हणून जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी मिळूनही ते मोदींसह भाजपचं (BJP) मन जिंकण्यात यशस्वी ठरले.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. धामी हे विधानसभेला पराभूत झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे बहुमत मिळालेले असूनही १० दिवस उलटले तरी भाजपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करता आला नव्हता. पण चर्चेमध्ये धामी यांचेच नाव आघाडीवर होते. त्यांना जुलै २०२१ मध्ये मुख्यमंत्रिपद मिळाले होते. केवळ आठच महिन्यांत निवडणुकीचा निकाल लागला. म्हणजे काम करण्यासाठी जेमतेम सहा-सात महिनेच मिळाले. हाच काळ त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरला.

काही महिन्यांत तीन मुख्यमंत्री पाहिलेल्या उत्तराखंडमधील नागरिकांना आपलंस करून घेण्यात धामी यशस्वी ठरले. राज्यात पुन्हा भाजपला सत्ता मिळणार की नाही, याबाबत राजकीय विश्लेषकही साशंक होते. पण धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहूमत मिळवलं. भाजपनंही धामींच्या करिष्म्याला श्रेय देत त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा मान दिला. धामी तरुण आहेत. याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते धामी जरी पराभूत झाले असले तरी डोंगराळ भागात त्यांच्याच नावावर आपण निवडणूक जिंकली आहे.

यापूर्वी खटीमा (उधमसिंह नगर) मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले पुष्कर सिंह धामी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री ठरले होते. धामी यांचा जन्म पिथौरागढमधल्या टुण्डीमध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम केले. पुढे ते भारतीय जनता युवा मोर्चाचे दोनदा अध्यक्षही झाले होते. उत्तराखंडची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले. तेव्हा पासून भगतसिंह कोश्यारींचे निकटवर्तीय आणि शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जातं.

धामी कार्यकाळ पूर्ण करणार का?

उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर त्याच महिन्यात पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. यानंतर उत्तराखंडमध्ये लगेचच विधानसभा निवडणूक होत असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. अखेर धामी यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवण्यात आली होती. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. नंतर तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT