Rajya Sabha MP Raghav Chadha has raised questions after his name was excluded from Punjab’s draft voter list during the SIR process. Sarkarnama
देश

Raghav Chadha : राघव चड्ढा यांंना निवडणूक आयोगाचा मोठा झटका; 'शिफ्टेड' शिक्का मारत मतदार यादीतून नाव वगळलं

Raghav Chadha Name Removed Punjab SIR : राघव चड्ढा यांनी आरोप केला की, "BLO, AERO, ERO आणि DEO यांसारख्या पदांवर काम करणारे अधिकारी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय पंजाब कॅडरमधील IAS अधिकारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात. या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोस्टिंग आणि कारकिर्दीवर राज्य सरकारचा प्रभाव असतो."

Jagdish Patil

Punjab SIR News : पंजाबमध्ये निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ड्राफ्ट मतदार यादीतून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचं नाव वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावापुढे ‘कायमचे स्थलांतरित’ अशी नोंद करण्यात आली आहे.

देशभरात SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पंजाबमध्येही या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल २०.६६ लाख मतदारांची नावं ड्राफ्ट मतदार यादीतून हटवण्यात आली आहेत. ही संख्या SIR प्रक्रियेपूर्वीच्या पंजाबमधील एकूण मतदारसंख्येच्या सुमारे ९.७ टक्के आहे.

याच पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. नुकतंच आम आदमी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेल्या चड्ढा यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चड्ढा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडताना सांगितलं की, ते पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचं मतदार ओळखपत्र मोहाली येथे नोंदणीकृत आहे. असं असतानाही ड्राफ्ट मतदार यादीत त्यांच्या नावासमोर ‘स्थलांतरित’ अशी नोंद करण्यात आली आहे.

चड्ढा यांनी स्पष्ट केलं की, सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही अंतिम मतदार यादी नसून केवळ ड्राफ्ट यादी आहे. ‘दावे आणि हरकती’ नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यादरम्यान मतदारांच्या नावांमध्ये आवश्यक दुरुस्ती करता येते. अंतिम मतदार यादी ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

आपलं नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी SIR मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपलब्ध असलेल्या प्रक्रियेचा वापर सुरू केल्याचंही चड्ढा यांनी सांगितलं. मात्र, हा प्रकार केवळ लिपिक किंवा प्रशासकीय चूक असल्याचं मानण्यास त्यांनी नकार दिला. आपलं नाव मतदार यादीतून वगळणं हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पंजाब सरकारवरही चड्ढांचा निशाणा

राघव चड्ढा यांनी या प्रकरणावरून पंजाबमधील भगवंत मान सरकारवरही निशाणा साधला. मतदार यादीच्या पुनरिक्षण प्रक्रियेत तळागाळातील बूथ लेव्हल ऑफिसरपासून (BLO) ते पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत विविध स्तरांवर पंजाब सरकारच्या प्रशासनातील अधिकारी कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, BLO, AERO, ERO आणि DEO यांसारख्या पदांवर काम करणारे अधिकारी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय पंजाब कॅडरमधील IAS अधिकारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात. या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोस्टिंग आणि कारकिर्दीवर राज्य सरकारचा प्रभाव असतो, असा दावा चड्ढा यांनी केला.

त्यामुळे निवडणुकीशी संबंधित जबाबदारी पार पाडताना त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जाऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. “कोण आपली बदली करू शकतं आणि कोण आपल्या कारकिर्दीत अडथळे निर्माण करू शकतं, याची अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राजकीय दबाव निर्माण करून आप सरकार राजकीय सूड उगवत आहे,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT