Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींची 'आक्रमक' साद: 'दिल्ली चलो'चा नारा, पोलिसांच्या लाठ्यांना न घाबरता 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

Rahul Gandhi appeals to student organisations : राहुल गांधी यांनी देशातील जनतेला लाठीचार्जला न घाबरता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. त्यांच्या वक्तव्याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

Rashmi Mane

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील लोकांना 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या 'चलो दिल्ली' मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीचे रक्षण, कथित 'व्होट चोरी'ला विरोध आणि संविधानाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईची किंवा लाठीचार्जची भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली. 'चलो दिल्ली रामलीला मार्च' हा केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशाच्या लोकशाहीशी संबंधित आंदोलन असल्याचे त्यांनी म्हटले. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर नाराज असलेल्या तसेच संविधानाचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांची, लाठ्यांची चिंता करू नका'

मोर्चात सहभागी होण्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'पोलिसांची चिंता करू नका, लाठ्यांची चिंता करू नका.' भाजपकडून अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस होणार नाही, असा दावाही त्यांनी आपल्या संदेशात केला. संविधान आणि देशाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन

राहुल गांधी यांनी कोणत्याही राजकीय विचारसरणीशी संबंधित असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, विचारांवर किंवा मतांवर हल्ला होत असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. हा मोर्चा देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

1 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर मोर्चा

इंडिया आघाडीकडून 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर 'चलो दिल्ली' मोर्चा आणि महारॅली आयोजित करण्यात आली आहे. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (SIR) अनियमितता आणि 'व्होट चोरी'च्या आरोपांवरून विरोधकांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

SCROLL FOR NEXT