RAHUL-GANDHI 
देश

नोटबंदी आणि जीएसटीवरून भाजपला घेरण्यासाठी राहुल गांधी यांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबर खलबते 

अजय बुवा : सरकारनामा

नवी दिल्ली   :  नोटबंदी आणि जीएसटीवरून गुजरात निवडणुकीमध्ये आणि देशभरात सत्ताधारी भाजपला घेरण्याची रणनिती ठरविण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्ष सरचिटणीस व प्रभारींशी आज तब्बल तीन तास चर्चा केली.

"नोटबंदी म्हणजे आतापर्यंतचे महासंकट असून आठ नोव्हेंबर हा देशासाठी सर्वात दुःखाचा दिवस होता, असे असताना त्याचा आनंदोत्सव कशासाठी", अशा शब्दात राहुल गांधींनी भाजपवर तोफ डागली. 

नोटबंदीच्या वर्षपूर्तीचा ' नोटबंदीचे वर्षश्राद्ध' असा खोचक उल्लेख करणाऱ्या राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेऊन या मुद्‌द्‌यावरील व्यूहरचनेची चर्चा केली.

अपवाद वगळता सर्व सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रभारी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, जयराम रमेश त्याचप्रमाणे पंजाबचे अर्थमंत्री मनप्रित बादल हे देखील उपस्थित होते. 

सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीला त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि कमलनाथ, दिग्विजयसिंह आदी सरचिटणीस गैरहजर होते.

सव्वा दहा ते दुपारी सव्वा अशी तब्बल तीन तास ही बैठक सुरू होती. त्यात नोटबंदीमुळे वर्षभरात झालेले परिणाम, जीएसटीची विस्कळीत अंमलबजावणी आणि त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यावर सादरीकरणही झाले.

 बैठकीमध्ये आठ नोव्हेंबरला देशभरात करावयाच्या आंदोलनाची रुपरेषा ठरली. त्यात सर्व सरचिटणीस व राज्यांचे प्रभारी आपापली जबाबदारी असलेल्या राज्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करतील.

तर सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे, निदर्शने, धरणे आंदोलनाद्वारे नोटबंदीचा निषेध केला जाईल, असे बैठकीत ठरले. जीएसटी विरोधातील आंदोलनाची रुपरेषा नंतर ठरविण्याचाही यावेळी निर्णय झाला. 

बैठकीनंतर राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून हल्ला चढवला. नोटबंदीसारख्या महासंकटाचा आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण काय, असा सवाल करताना नोटबंदी व जीएसटी हे निर्णय म्हणजे पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेले 'टॉर्पिडो' (पाणबुडीभेदी क्षेपणास्त्र) आहेत, असाही टोला लगावला.

 एका टॉर्पिडोने (नोटबंदी) अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला. आणि दुसऱ्या टॉर्पिडोने तर अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला नेली.

आठ नोव्हेंबर हा आतापर्यंतचा सर्वात दुःखाचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या भावनांची आजिबात कदर नाही.

जीएसटी ही चांगली संकल्पना आहे. मात्र चांगली कल्पनाही कशा प्रकारे भ्रष्ट करता येते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जीएसटी असल्याची कोपरखळी राहुल गांधींनी लगावली. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला नोटबंदीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कॉंग्रेसने आठ नोव्हेंबरला देशभरात काळा दिवस पाळण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

अन्य विरोधी पक्षांनीही यासाठी कॉंग्रेसला साथ देण्याचे जाहीर केले आहे. तर, प्रत्युत्तरादाखल सत्ताधारी भाजपने कॉंग्रेसवर काळ्या पैशाची पाठराखण चालविल्याचा आरोप करताना या दिवशी ' काळा पैसा विरोधी दिवस' साजरा करण्याचे ठरविले आहे.

दुसरीकडे, गुजरात निवडणुकीच्या प्रचारामध्ये नोटबंदीमुळे वाढलेली बेरोजगारी आणि जीएसटीमुळे लहान व्यावसायिकांमध्ये असलेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याचा प्रचारही कॉंग्रेसने जोरदारपणे चालविले आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT