Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक गंभीर आरोप केले होते. हे आरोप भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. यापार्श्वभूमीवर लोकसभेच्या 'विशेषाधिकार समिती'ने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं विशेषाधिकार भंगाची नोटीस सादर केली होती.
२९ जुलै २०२६ रोजी लोकसभेत Public Examinations (Prevention of Unfair Means) Amendment Bill, 2026 अर्थात सार्वजनिक परीक्षा/अयोग्य मार्गांचा प्रतिबंध संशोधन विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करत लोकांच्या तीन श्रेण्या सांगितल्या होत्या. त्या म्हणजे विद्यार्थी, इडियट्स (मूर्ख) आणि अंधभक्त. पण यातील 'इडियट' हा शब्द किरेन रिजिजू, राजनाथ सिंह यांच्या आक्षेपानंतर असंसदीय ठरवला गेला आणि अध्यक्ष ओम बिरला यांनी तो रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी हे स्पष्ट केलं होतं की, हा शब्द कोणत्याही खासदारासाठी नाही, तर विद्यार्थिनीच्या उद्गारांचा उल्लेख आहे. याशिवाय त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध थेट आरोप केले, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला आणि भाषण खंडित झालं.
'सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६' वरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी असंसदीय व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचं सांगत तसंच नियम ३५३ अन्वये पुरेशी पूर्वसूचना न देता माननीय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केल्याबद्दल, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विशेषाधिकार भंगाची नोटीस सादर केली होती. या नोटिशीवर २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत उत्तर किंवा आपली बाजू मांडण्याचे निर्देश राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत.
तसंच, भाजप खासदार डॉ. संजय जयस्वाल यांनी २९ जुलै २०२६ रोजी लोकसभेच्या 'विशेषाधिकार समिती'ला राहुल गांधींविरोधात एक पत्र दिलं होतं. या पत्रात त्यांनी नमूद केलं होतं की, 'सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६' वरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गृहमंत्र्यांविरुद्ध कथितरीत्या असंसदीय शब्दांचा वापर केला होता. या बाबीची दखल घ्यावी आणि 'कार्यपद्धतीचे नियम' यांनुसार योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.