Rahul-Gandhi-Arun-Jaitley
Rahul-Gandhi-Arun-Jaitley 
देश

'पीएनबी' गैरव्यवहारात  जेटली यांच्या कन्येला सीबीआयने का सोडले?- राहुल गांधी 

सरकारनामा न्यूज ब्यूरो

नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणात सरकारला संसदेत घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॉंग्रेसने आता यात अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. या गैरव्यवहारातील आरोपींच्या वकिलांच्या कार्यालयावर छापे घातले असताना जेटली यांच्या वकील कन्येच्या कार्यालयाला सीबीआयने का सोडले, असा प्रश्‍न करून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संशयाची सुई अर्थमंत्र्यांकडे वळवली आहे.

जेटली आपल्या वकील कन्येला पाठीशी घालत असल्याचा आरोप राहुल गांधींनी ट्विटद्वारे केला. राहुल यांनी म्हटले आहे, " आता हे सिद्ध झाले आहे, की अर्थमंत्री पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारावर यासाठी गप्प राहिले, कारण त्यांना आपल्या वकील कन्येला वाचवायचे होते. हा गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या एक महिना आधी जेटली कन्येला आरोपींकडून (नीरव मोदी-मेहुल चोक्‍सी यांची कंपनी) घसघशीत रक्कम मिळाली होती. आरोपींचे वकील असलेल्यांच्या सर्वांच्या ' लॉ फर्म'वर -कार्यालयावर छापे टाकणाऱ्या सीबीआयने यांचीच लॉ फर्म का सोडली?"

या मुद्द्यावर संसदेत कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, असा पवित्रा कॉंग्रेसने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नव्हते. आजही लोकसभा ठप्पच राहिली. संसदेतील तिढा सोडविण्यासाठी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नसल्याने संसदेतील गोंधळ सुरूच राहिला. फक्त पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारावर चर्चा व्हावी आणि तीही स्थगन प्रस्तावानुसारच केली जावी, अशी कॉंग्रेसची मागणी आहे, तर कॉंग्रेसनेच दिलेल्या प्रस्तावानुसार अल्पकालीन चर्चा होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT