Sanjay Raut, Rahul Gandhi
Sanjay Raut, Rahul Gandhi Sarkarnama
देश

राऊतांच्या भेटीनंतर पाचव्या दिवशीच राहुल गांधींचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

जयपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागील आठवड्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत तर्कविर्तक लढवले जात आहेत. पण या भेटीनंतर चार दिवसांतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कार्यकर्त्यांना हिंदू (Hindu) आणि हिंदुत्ववाद्यांमधील फरक समजावून सांगितला आहे.

जयपूर येथे काँग्रेसच्या (Congress) महागाईविरोधातील सभेमध्ये राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू व हिंदुत्ववाद्यांमधील फरक समजावून सांगत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या देशात हिंदुंचं राज्य नसून हिंदुत्ववाद्यांचा राज्य आहे. त्यांना पुन्हा घालवून हिंदूची सत्ता आणायची आहे, असं आवाहन राहुल यांनी यावेळी केली.

आज भारतीय राजकारणात हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हे हिंदू होते तर गोडसे हिंदुत्ववादी. देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांचं राज्य आहे. आपल्या पुन्हा एकदा या हिंदुत्ववाद्यांना बाहेर काढून हिंदुंचे राज्य आणायचे आहे. हिंदू म्हणजे जो सगळ्यांना आपलं मानतो, जो कुणालाच घाबरत नाही, जो प्रत्येक धर्माचा आदर करतो. ते आहेत हिंदू, असं राहुल गांधी म्हणाले.

हिंदुत्ववादी आपलं संपूर्ण आयुष्यष्य सत्तेसाठी घालवतो. त्याला सत्याशी काही देणंघेणं नाही. त्याला फक्त सत्ता हवी आहे. सत्तेसाठी तो काहीही करू शकतो. कुणाला मारेल, काहीही बोलेल, जाळून टाकेल पण सत्ता हवी असते. त्याचा रस्ता सत्याग्रह नव्हे तर सत्ताग्रह आहे. हिंदूत्ववादी भीतीसमोर झुकतो, माथा टेकवतो. त्याची भीतीच त्याला बुडवते. या भीतीतूनच त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो, असे राहुल यांनी सांगितलं.

पण हिंदू भयाचा सामना करतो आणि एक इंचही मागे हटत नाही. भीतीचा सामना केल्यानं त्यांच्या मनात शांती निर्माण होते. त्याच्या मनात प्रेमभावना येते. हा हिंदू व हिंदूत्ववादीमधील फरक आहे. हे भाषण मी यासाठी देतोय, कारण तुम्ही सर्वजण हिंदू आहात, हिंदूत्ववादी नाही. हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. आज या देशात भीती, दु:ख आहे. हे काम हिंदूत्ववाद्यांनी केलं आहे. त्यांना फक्त सत्ता हवी असून ते 2014 पासून सत्तेत आहेत. अशा हिंदूत्ववाद्यांना सत्तेतून पायउतार करून पुन्हा हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, असे राहुल यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT