Rahul Gandhi sarkarnama
देश

राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना रोखठोक सवाल; तुम्ही कोणासाठी काम करता?

काँग्रेस (Congress) नेत्यांचा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अध्यक्षपद स्विकारण्यासाठी आग्रह

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : तुम्ही कोणासाठी काम करता? कॉंग्रेस (Congress) पक्षासाठी की राहूल गांधी नावाच्या व्यक्ती साठी? जर तुम्ही कॉंग्रेससाठी काम करत असाल तर मीच अध्यक्ष झाले पाहिजे, हा आग्रह तुम्ही सोडायला हवा आणि राहुल गांधींसाठी (Rahul Gandhi) काम करत असाल तर कॉंग्रेसच्या रचनेत तुमचे काही काम नाही. तसे असेल तर (सध्याचा) भाजप (BJP) व आपण यात फरक काय राहिला? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मात्र, तरीही कॉंग्रेसजनांचा हट्ट कमी होण्यास तयार नाही. पक्षाच्या व देशाच्या हितासाठी, संघ-भाजप विरूध्द एकत्रपणे लढून देश सांभाळण्यासाठी तुम्हीच पक्षाध्यक्ष झाले पाहिजे, असे सांगून आम्ही राहूल गांधी यांना पक्षाध्यक्ष होण्यास भाग पाडू, याचा संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुनरूच्चार केला.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या पाठोपाठ जी-२३ गटातील अन्य नेतेही राहूल यांच्यावर घणाघाती टीका करू लागले आहेत. आम्ही कॉंग्रेसचे सदस्य आहोत, भाडेकरू नव्हे. ज्यची वॉर्डात लढण्याचीही पात्रता नाही त्यांच्या सल्ल्याने पक्षनेतृत्व (राहूल) काम करत असेल तर ते निव्वळ हास्स्यास्पद आहे, असा हल्ला खासदार मनीष तिवारी यांनी चढविला.

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीच्या फेऱ्यात अडकवल्यावर मागच्या महिन्यात कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मॉडेल टाऊन भागातील किंग्रज वे कॅम्प पोलिस ठाण्यात नेले होते. कॉंग्रेस खासदार, अनेक प्रदेशाध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्री हेही तेथे होते. एका प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती शेअर केली. सुमारे सहा ते सात तास स्थानबध्द होते. त्या काळात मग राहूल गांधी व इतर कॉंग्रेसजनांची छोटेखानी मैफलच तेथे जमली होती. उपनिषदांपासून साहित्य-काव्य-राजकारण-स्वातंत्र्य संग्राम आदी विविध विषयांवर चर्चा सुरू होती.

कर्नाटकच्या खासदारांनी कविता सादर केली. त्यात पुनर्जन्माचा उल्लेख झाला तेव्हा राहूल गांधी यांनी, पुनर्जन्म ही संकल्पना किती धर्मांत आहे यावर विवेचन केले होते. कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदाची चर्चा सुरू होताच अनेक खासदारांनी आक्रमकपणे, तुम्ही अध्यक्ष झाला नाहीत तर तुम्ही हरलात, घाबरलात असा अर्थ काढला जाईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. एका महिला खासदारांनी डोळ्यात पाणी आणून, तुम्ही ही जबाबदारी आत्ता घेतली नाहीत तर संघ-भाजप या देशाची संस्कृतीच गिळून टाकतील, असे आर्जव केले. त्यावर राहूल यांनी शांतपणे 'तुम्ही काम कोणासाठी करता? हा प्रश्न विचारला.

मला कोणतेही पद नको व त्यावर माझ्यापुरता मी ठाम आहे. देश सध्या ज्या भीषण परिस्थितीतून जात आहे त्याला सावरण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. व त्यात तुम्हाला माझ्याबरोबर यायचे तर या, असे ते म्हणाले. कोणत्याही मानसन्मानाच्या पदाबाबत राहुल यांना तिटकाराच असून भविष्यात संधी आल्यावर ते पंतप्रधानपदही कितपत स्वीकारतील याची शंका वाटते, असेही निरीक्षण या नेत्याने मांडले.

दरम्यान, गुलाम नवी आझाद, मनीष तिवारी, आनंद शर्मा आदींच्या टीकेनंतर कॉंग्रेसजनांनी राहूल गांधी यांच्यावर पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास पुन्हा दबाव आणण्यास सुरवात केली आहे. ''सारी पदे, मानसन्मान उपभोगल्यावर आता राहुल यांच्यावर टीका करणाऱ्यांना कॉंग्रसने मार्गदर्शक मंडळात टाकण्यापूर्वीच ते स्वतःच सोडून जात आहेत. हे पक्षासाठी एका प्रकारे उत्तम आहे, असा टोला एका ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने लगावला. १९९८ मध्ये सोनिया गांधी यांच्यावर तत्कालीन ज्येष्ठ पक्षनेत्यांनी असाच दबाव आणल्यावर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपद स्वीकारले होते. याची आठवणही करून दिली जाते.

आझाद व तिवारी यांनी भले थेट राहुल गांधींवर निशाणा साधला असेल. मात्र, राहुल यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, हा कॉंग्रेसजनांचा आग्रह कमी होण्याचे नाव घेत नाही. आम्ही राहुल गांधी यांना कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्यास पटवून देऊ, कारण त्यांच्याशिवाय कोणत्याही नेत्याला देशपातळीवर मान्यता नाही. राहूल यांच्याशिवाय पक्षातील अन्य नेत्याचे नाव सांगा, असे खर्गे म्हणाले.

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना सांगितले की जेव्हा शिपाई नेत्याला पक्षाबद्दल माहिती देतात व त्याच्या मताने निर्णय होतात तेव्हा हसू येते. वॉर्डाची निवडणूक लढवण्याचीही ज्यांची क्षमता नाही ते काँग्रेसच्या नेत्यांचे लाळघोटे लोक जेव्हा नेतृत्वाला पक्षाबद्दल माहिती देतात तेव्हा ते हास्यास्पद असते. आम्ही अत्यंत गंभीर परिस्थतीत आहोत. आम्हाला तुम्ही पक्षाबाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही ते पाहून घेऊ असे सांगतानाच, आपण ४२ वर्षे या पक्षासाठी दिली आहेत, असाही गर्भित इशाराही तिवारी यांनी दिला.

काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्यासाठी रविवारी बैठक होणार आहे. विदेशातून सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीतही अनेक पक्षनेते राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी दबाव आणणार हेही स्पष्ट आहे. मात्र, आपण पुन्हा पक्षाध्यक्ष होणार नाही, या भूमिकेवर राहुल गांधी ठाम असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT