नवी दिल्ली : काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू असतानाच पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी AICC सचिवांची थेट ‘शाळा’ भरवली. 10 जनपथ येथे झालेल्या या बैठकीत AICC च्या 64 सचिवांचे विविध मुद्द्यांवर 'परीक्षा' घेण्यात आली. यावेळी सचिवांना त्यांच्या कामकाजासह पक्षाच्या संघटनेबाबत थेट आणि काहीसे अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले.
64 सचिवांना चार गटांमध्ये विभागून त्यांचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्यात आले. पहिल्या गटाची बैठक राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत झाली. प्रत्येक सचिवाला साधारण पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आले. उत्तर देताना मुद्देसूदपणा, वैचारिक स्पष्टता, संवादकौशल्य आणि संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘काँग्रेसने केलेली अशी कोणती एक चूक आहे, जी सुधारण्याची गरज आहे?’, ‘तुमच्या जबाबदारीच्या राज्यातील पाच प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे सांगा’, ‘तुमच्या मते AICCचे तीन सर्वोत्तम सचिव कोण? आणि का?’, ‘AICC सचिवाच्या कामाची पद्धत एका शब्दात कशी सांगा?’ तसेच ‘तुमच्या राज्यात पक्षासाठी काय योग्य आणि काय अयोग्य सुरू आहे?’ असे प्रश्न सचिवांना विचारण्यात आले.
या बैठकीत केवळ कामगिरीचा आढावा घेण्यापेक्षा संबंधित सचिवांचा पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे एका सहभागी सचिवाने सांगितले. AICC सचिवांकडून दर महिन्याला के. सी. वेणुगोपाल यांना कामाचा अहवाल दिला जातो. त्यामुळे नेतृत्वाकडे त्यांच्या दौऱ्यांची, कार्यक्रमांची आणि कामगिरीची माहिती आधीपासूनच उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सचिवांना उत्तरे देताना थेट मुद्द्यावर येण्यास आणि विषयांतर टाळण्यास वारंवार सांगितले. काही प्रश्नांच्या उत्तरांवर गांधी बहीण-भावंड काहीसे अस्वस्थ दिसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
तीन सर्वोत्तम AICC सचिवांची नावे विचारल्यानंतर काही सचिव सुरुवातीला संकोचले. सहकाऱ्यांची नावे घेतल्यास त्याचा अर्थ पक्षपात असा काढला जाऊ शकतो, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, प्रियंका गांधी यांनी संकोच न करता उत्तर देण्यास सांगितले. सहकाऱ्यांबद्दल चांगल्या गोष्टी सांगण्याचाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक पातळीवर मोठी फेररचना सुरू आहे. AICC सचिवपदासाठी सुमारे 130 इच्छुकांच्या नव्याने मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर विद्यमान 64 सचिवांचे हे मूल्यांकन झाले. पक्षातील सूत्रांनुसार, सध्याच्या AICC सचिवांपैकी जवळपास 50 टक्के चेहरे बदलले जाण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेमागे असल्याचे सांगितले जात आहे.
AICC सचिवांची नियुक्ती साधारणपणे महासचिव आणि संबंधित राज्यांच्या प्रभारींसोबत संघटनात्मक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी केली जाते. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या या थेट आकलनामुळे आगामी संघटनात्मक बदलांकडे काँग्रेसच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.