Satish Poonia  Sarkarnama
देश

भाजपनं दुसऱ्या उमेदवाराची आशा सोडली! खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच दिली कबुली

भाजप आमदारांनी मतदान करताना घातलेला गोंधळ महागात

सरकारनामा ब्युरो

जयपूर : राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) आमदारांची मते देताना मोठा गोँधळ घातला आहे. यातील एका आमदारानं तर चक्क काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला मतदान केलं आहे. आणखी एका भाजप आमदारानं भाजपच्या दुसऱ्याच उमेदवाराला मत दिलं आहे. यामुळे भाजप पुरस्कृत उमेदवार अडचणीत आले आहेत. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्यांच्या विजयाची आशा सोडून दिली आहे. (Rajya Sabha Election News)

राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले आहेत. आता भाजप आमदारांनी मतदानात घातलेल्या घोळामुळं चंद्रा यांच्या विजयाची शक्यता धूसर झाली आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनीच याबाबत कबुली दिली आहे. पूनिया यांनीच आधी भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा दावा केला होता. आता यू-टर्न घेत भाजपचा एक उमेदवार निवडून येईल, असे त्यांनी जाहीर केले. आम्ही भाजप पुरस्कृत उमेदवारासाठी प्रयत्न करून काँग्रेसला गुडघ्यावर आणले, असा दावाही त्यांनी केला.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजप सत्तेत येईल, असाही दावा पूनिया यांनी केली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवले. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

भाजपच्या आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले. यामुळे त्यांचे मत बाद करण्यात आले आहे. भाजपच्या दुसऱ्या आमदार सिद्दी कुमारी यांना मत देताना गोंधळ घातला. भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांना मत द्यायचे होते. प्रत्यक्षात त्यांनी भाजपचे उमेदवार घनश्याम तिवारी यांना मतदान केले. याचवेळी भाजपचेच आमदार कैलास मीना यांनी मत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दाखवल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे. यामुळे त्यांचेही मत बाद होण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळाचा फटका चंद्रा यांना बसेल, असे मानले जात आहे.

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT