Ashok Gehlot Sarkarnama
देश

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकाच बाणात मारणार दोन पक्षी

राज्यसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांचे डावपेच सुरू

सरकारनामा ब्युरो

जयपूर : राज्यसभा निवडणुकीमुळं वातावरण तापलं असून, राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने (BJP) उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पाठिंबा देऊन मैदानात उतरवलं आहे. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तातडीनं अपक्ष आमदारांची बैठक घेऊन काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांचं संख्याबळ निश्चित केलं आहे. गेहलोत हे आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपसह आपल्याच पक्षाचे नेते सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधण्याच्या तयारीत आहेत. (Rajya Sabha Election News Updates)

राजस्थानमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. सचिन पायलट यांच्याकडे राज्याची सूत्रे जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. याबाबत पक्ष नेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याचेही सांगितले जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसचे तिन्ही उमेदवार निवडून आणून आपली ताकद पक्ष नेतृत्वाला दाखवून देण्याची संधी गेहलोत यांना मिळाली आहे. त्यामुळे गेहलोत हे एकाच बाणात दोन शिकार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या उमेदवाराचा पराभव आणि आपली खुर्ची बळकट करुन पायलट यांना शह देण्याची गेहलोत यांची खेळी आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर सरकारची धुरा पायलट त्यांच्या खांद्यावर दिली जाईल, अशी चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात आहे. असे असतानाही मु्ख्यमंत्री गेहलोत हे ताकदीनं राज्यसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्यातील 13 अपक्ष आमदारांपैकी 10 जणांची भेट घेतली. मुख्यमंत्री गेहलोत आणि काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची भेट घेतली आहे. या बैठकीला काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामत जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तिवारी यांच्या बाहेरचा असा शिक्का राज्यातील काँग्रेस नेते मारत आहेत. तिवारींच्या उमेदवारीबद्दल पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. यातच आता भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवून काँग्रेसला धक्का दिला आहे. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

चंद्रा यांच्या एंट्रीमुळं राज्यसभेच्या चार जागांसाठी आता राजस्थानमध्येे आता पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT