BJP Sarkarnama
देश

Rajya Sabha Election 2024 : भाजपने लोकसभेआधी वाढवलं विरोधकांचं टेन्शन; 15 जागांसाठी होणार निवडणूक

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभेची निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेची निवडणूक होत असल्याने सत्ताधारी भाजपसाठी ही अग्निपरीक्षा मानली जात आहे. देशभरातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, 41 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून, त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. (Rajya Sabha Election 2024)

राज्यसभेच्या 41 जागा बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांसह काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, एल. मुरुगन आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 20 जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसला सहा, तृणमूल काँग्रेसला चार, वायएसआर काँग्रेसला तीन, राजद आणि बीजेडीला प्रत्येकी दोन तर एनसीपी, शिवसेना व बीआरएसला प्रत्येक एक जागा मिळाली आहे.

आता 15 जागांवर होणार लढत

उत्तर प्रदेशसह हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणी भाजपचे (BJP) उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या जागांवरील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार फोडोफोडीची भीतीही व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशात एका जागेसाठी रंगत

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 10 जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपचे सात, तर समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात होता, पण भाजपने आठवा उमेदवार मैदानात उतरवल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. राज्यात एनडीएकडे 286 आमदार असून, त्यांना सर्व आठ जागांसाठी आणखी दहा आमदारांची गरज आहे.

सपाला 111 आमदारांचे समर्थन अपेक्षित असून, सपाचे 108, काँग्रेसचे दोन तर बसपाचा एक आमदार आहे. ही सर्व मते सपाच्या उमेदवाराला मिळाली तर भाजपच्या आठव्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. मात्र, सपाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी आधीच जया बच्चन यांना मतदान करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सपाच्या अडचणी वाढल्या आहेत, तर लोकसभेच्या जागावाटपावरून सपा आणि काँग्रेसमध्येही तणाव वाढला आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेस-भाजप आमनेसामने

हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी मैदानात आहेत. काँग्रेसचे संख्याबळ 43 असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण भाजपने हर्ष महाजन यांना मैदानात उतरवत काँग्रेसचे टेन्शन वाढवले आहे. काँग्रेसमधील काही आमदार महाजन यांना मतदान करतील, अशी जोरदार चर्चा आहे.

कर्नाटकात चार जागांसाठी पाच उमेदवार

कर्नाटकात चार जागा असून, काँग्रेसचे तीन आणि भाजप-जेडीएसचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे 135 आमदार असून, भाजपकडे 66 तर जेडीएसकडे 19 आमदार आहेत. काँग्रेसला तीनही उमेदवारांच्या विजयासाठी 135 चे संख्याबळ आवश्यक असून, ते त्यांच्याकडे आहे. भाजपचा एक उमेदवार सहज निवडून येईल. मात्र, दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसमधील काही आमदारांना वळवावे लागणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT