Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Rajya Sabha Latest News
Narendra Modi News, Amit Shah News in Marathi, Rajya Sabha Latest News Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यांतही भाजपनं टाकलेत फासे

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. देशभरातील 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर चार राज्यांतील 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांसह राजस्थान, हरयाणा आणि कर्नाटकातील जागांचा समावेश आहे. या चारही राज्यांमध्ये एकूण 21 उमेदवार रिंगणात असून चारही ठिकाणी भाजपने (BJP) फासे टाकले आहेत. (Rajya Sabha Election News)

राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार होती. पण 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 18 उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील आठ जागा एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. आता संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर तीन राज्यांतील निवडणुकीकडे लागलं आहे.

महाविकास आघाडीचा कस लागणार

महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक आहे. संख्याबळानुसार भाजपच्या दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. तर सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात आहेत. ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली असून आघाडीतील मित्रपक्ष, अपक्षांना गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

कर्नाटकातही चौथ्या जागेचा तिढा

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही एका जागेचा तिढा आहे. राज्यसभेच्या चार जागांपैकी भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. चौथ्या जागेसाठी भाजप, काँग्रेससह जेडीएसने उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. काँग्रेसकडून जेडीएसचे नाराज आमदार तर भाजपकडून काँग्रेसमधील आमदार गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

राजस्थानमध्ये भाजपची खेळी

राजस्थानमध्ये रिक्त होणाऱ्या चारही जागा भाजपच्या ताब्यात होत्या. पण यावेळी तीन जागांचे नुकसान होणार आहे. भाजपचा केवळ एकच उमेदवार विजयी होऊ शकतो. तर काँग्रेसचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला असून उद्योजक सुभाष चंद्रा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बसपाने आपल्या सहा बंडखोर आमदारांसाठी व्हीप काढत चंद्रा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हरयाणात माकन यांच्यासमोर आव्हान

हरयाणामध्ये दोन जागांसाठी लढत आहे. एक जागा भाजपला मिळणार आहे. तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसने अजय माकन यांना रिंगणात उतरवलं आहे. अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे माकन यांच्या विजयासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे. राज्यात भाजपचे 40 तर काँग्रेसचे 31 आमदार असून विजयासाठी 31 हा जादूई आकडा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT