Parliament House
Parliament House sarkarnama
देश

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर; गोयल, राऊतांचा कार्यकाळ संपणार

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : महाराष्ट्रात जुलै २०२२ मध्ये रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, तर १० जून रोजी मतदान होणार आहे. या सहा जागांमध्ये भाजपच्या ३, (BJP) शिवसेनेची (Shivsena) १, काँग्रेसची (Congress) १ आणि राष्ट्रवादीच्या १ जागेचा समावेश आहे. महाराष्ट्राशिवाय आणऱी १४ राज्यातील एकूण ५१ जागांसाठी देखील निवडणूक जाहीर झाली आहे. जुलै महिन्यामध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने ही राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्रातून भाजपच्या ३ जागांमध्ये पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांची मुदत संपली आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे २ आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १ खासदार सहज निवडून येवू शकतात. यात भाजपकडून पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांचा दावा

२ जागा भाजप आणि ३ महाविकास आघाडी जिंकू शकते. यानंतर उर्वरित एका जागेसाठी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढवताना राज्यसभेसाठी लागणारी आमदारांची मत आणि सध्या सर्व पक्षांकडे असलेली मत यांचे गणित मांडले आणि आपण केलेल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी राज्यसभेवर पाठवा असे आवाहनही केले.

संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेलं गणित नेमकं आहे?

यानुसार २८८ / ६ = ४८. म्हणजे एक खासदार निवडून येण्यासाठी ४८ मतांची आवश्यकता आहे.

  • राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?

1. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडी ४८*३ = १४४ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे २५ मत शिल्लक राहत आहेत. जर चौथा खासदार निवडून आणायचा असल्यास आणखी २३ मतांची आवश्यकता आहे.

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४८*२ = ९६ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे १७ मत शिल्लक राहत आहेत. जर तिसरा खासदार निवडून आणायचा झाल्यास भाजपला आणकी ३१ मतांची आवश्यकता आहे.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीची शिल्लक २५ मत, भाजपप्रणित शिल्लक १७ मत आणि इतर ४ मत याच गणितावर राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या कामाची दखल घेवून सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT