Ashok Chavan Rajya Sabha Session Sarkarnama
देश

Ashok Chavan News : राज्यसभा सभापतींनी घेतली फिरकी अन् अशोक चव्हाण संतापले !

Jagdish Pansare

New Delhi News : राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राज्यसभेत एक गंमतीशीर प्रकार घडला.सभापती जगदीप धनखड यांनी अशोक चव्हाण यांचे नाव पुकारले पण ते बोलण्याआधी सभापतींनी अशोक चव्हाण यांची सभागृहाला अगदी संक्षिप्त ओळख करून दिली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदार आणि आता राज्यसभेवर निवड अशा शब्दात सभापतींनी अशोक चव्हाण यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यावर विरोधी बाकावरील काँग्रेसच्या नेत्यांनी संधी हेरली आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री, खासदार, आमदार काँग्रेसने केले, असा टोला लगावला.

यावर संतापलेल्या अशोक चव्हाण यांनी सभापती यांचे संक्षिप्तपणे माझी ओळख करून देत बायोडाटाच सभागृहात मांडल्याबद्दल आभार मानले. तसेच ही सगळी पद, निवडणुका मी काँग्रेसकडून जिंकलो होतो हे सांगायला मला कमीपणा वाटत नाही, असे सांगत विरोधकांनाही सुनावले.

लोकसभा निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.काँग्रेसचा मोठा नेता, महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री आणि बहुजन चेहरा पक्षात आल्याने सहाजिकच भाजपने त्यांना 48 तासांत राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना खासदार केले. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा अशोक चव्हाण यांचा भूतकाळ होता, तर भाजप वर्तमान काळ आहे. पण राजकारणात भूतकाळ पाठ सोडत नाही, असेच काहीसे अशोक चव्हाण यांच्याबाबतीत होताना दिसते आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला.अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा मोठा प्रभाव असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. या शिवाय इतर तीन मतदारसंघातही भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे मराठवाड्यात भाजपची पाटी कोरी झाली.

त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. पण लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि राज्यात झालेला पराभव हा मराठा आरक्षण, भाजप संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे झाल्याचा निष्कर्ष पक्ष निरीक्षक यांनी दिलेल्या अहवालात निघाला. त्यानंतर पराभवाचे खापर अशोक चव्हाण व इतर मराठवाड्यातील नेत्यांवर फोडणे थांबले.

लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात राज्यसभेत बोलण्याची संधी अशोक चव्हाण यांना मिळाली. पण त्याची सुरुवात सभापतींनी ओळख करून दिल्यानंतर काँग्रेसच्याा खासदारांनी चव्हाण यांना भूतकाळाची आठवण करून देत झाली. सभापतींनी सविस्तर ओळख करून दिली म्हणून त्यांचे आभार अशोक चव्हाण यांनी व्यक्त तर केले. पण त्यांच्यामुळेच विरोधकांना अशोक चव्हाण यांना डिवचण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांना खंतही वाटली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT