Rape Murder Accused Found Dead After Encounter Threat
Rape Murder Accused Found Dead After Encounter Threat 
देश

धक्कादायक : मंत्र्यांनी एन्काऊंटरची धमकी दिली अन् दोन दिवसांतच मृतदेह सापडला

वृत्तसंस्था

हैदराबाद :  सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या संशयित आरोपीचा एन्काऊंटर करण्याची उघड धमकी मंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांत या आरोपीचा मृतदेह रेल्वेमार्गावर आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या आरोपीनं आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी मंत्र्यांनी दिलेल्या धमकीचीच जोरदार चर्चा आहे. (Rape Murder Accused Found Dead After Encounter Threat)

हैद्राबादमधील (Hyderabad) सिंगारेनी कॉलनीमध्ये खून झालेली अल्पवयीन मुलगी राहत होती. ती 9 सप्टेंबर रोजी घरातून अचानक गायब झाली. त्याचदिवशी तिचा मृतदेह शेजारीच राहत असलेल्या आरोपीच्या घरात बेडशीटमध्ये गुंडाळेला आढळला. तिचा लैंगिक छळ झाल्याचे नंतर तपासात समोर आलं. पलाकोंडा राजू असं आरोपीचं नाव होतं. या दिवसापासून तोही गायब झाला होता. पोलिस त्याच्या शोधात होते.

ही घटना समोर आल्यानंतर तेलंगणाचे नगरविकास मंत्री मल्ला रेड्डी यांनी थेट आरोपीचा एन्काऊंटर करण्याची धमकी दिली होती. मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्याला आम्ही पकडू. त्याला पकडल्यानंतर एन्काऊंटर केला जाईल, असं वक्तव्य रेड्डी यांनी केलं होतं. घटना उघडकीस आल्यानंतर मोठे आंदोलन उभे राहिलेले होते. आरोपीला पकडून एन्काऊंटर करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात होते. 

रेड्डी यांच्या धमकीनंतर दोन दिवसांतच आरोपीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळं त्याची एन्काऊंटर केल्याची चर्चा सुरू आहे. पण पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हैदराबादपासून 130 किमी अंतरावरील रेल्वेमार्गावर आरोपीचा मृतदेह सापडला आहे. हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी याचे फोटोही ट्विटरवर टाकले आहेत. 

दरम्यान, रेड्डी यांनी मुलगी गायब झाली त्याच दिवशी आरोपी सापडल्याचं ट्विट केलं होतं. तासाभरातच आरोपीला पकडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. त्यानंतर सरकारविरोधातील रोष अधिकच तीव्र झाला होता. कोणतीही खातरजमा न करता माहिती देण्याचा उतावीळपणा मंत्र्यांना चांगलाच भोवला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT