ravi shankar prasad prakash javdekar resign from union cabinet
ravi shankar prasad prakash javdekar resign from union cabinet 
देश

मोठे फेरबदल : रविशंकर प्रसाद, जावडेकरांसह 12 केंद्रीय मंत्र्यांना डच्चू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या 12 जणांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या बड्या मंत्र्यासह एकूण 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या 12 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्यासह राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनालाल कटारिया, प्रतापचंद्र सरंगी,  देबश्री चौधरी यांचा समावेश आहे. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांची केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.  

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे तीन राज्यमंत्री होते परंतु, यातील धोत्रे यांची गच्छंती झाली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT