Russia-Ukraine War
Russia-Ukraine War Sarkarnama
देश

सैनिकांचं मनोबल खचल्याने रशिया अडचणीत; पुतीन वेगळा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत

सरकारनामा ब्युरो

कॅनबेरा : युक्रेनमधील (Ukraine) युद्ध लांबल्याने रशियाच्या (Russia) सैन्याचे मनोबल खचले आहे. युद्धात यश मिळत नसल्याने ते वरिष्ठांचे आदेश झुगारून देत आहेत. रशियन सैनिक आपली शस्त्रे खाली ठेवत असून, त्यांनी चुकून आपलेच विमान खाली पाडले, असा दावा ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने केला आहे. यामुळे रशियाकडून आता युद्धात वेगळा मार्ग अवलंबला जाण्याचा अंदाज आहे. (Russia Ukraine War)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा युक्रेनसोबत युद्ध सुरु करण्याचा अंदाज चुकला आहे, असे मत ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने नोंदविले आहे. युक्रेनच्या नागरिकांकडून एवढा प्रतिकार होईल, अशी अपेक्षा पुतीन यांना नव्हती. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर सर्व विरोधक आपल्या विरोधात एकत्र येतील, असेही पुतीन यांना वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या परिणांमाचाही अंदाज पुतीन यांना आला नाही. पुतीन यांना रशियाचा सैन्याच्या सामर्थ्याचा गर्व होता. युक्रेनमध्ये अतिशय कमी काळात विजय मिळवू, असा विश्‍वास त्यांना होता. परंतु, त्यांचे हे सर्व अंदाज चुकले आहेत.

रशियाच्या सैनिकांना वेळेवर अन्न आणि शस्त्रांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल खचले आहे. रशियन सैनिक वरिष्ठांचे आदेश पाळण्यास नकार देत आहेत. ते आपल्याच शस्त्रांची आणि वाहनांची तोडफोड करत आहेत. त्यांनी एकदा त्यांच्याच हवाई दलाचे लढाऊ विमान चुकून पाडले. पुतीन यांचे सल्लागार त्यांना खरी माहिती सांगण्यास घाबरत आहेत. असे असले तरी रशियन सरकारला या परिस्थितीची जाणीव झालेली आहे, असेही ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने सांगितले आहे.

रशियाकडून सायबर हल्ल्यांचे अस्त्र

रशियाच्या सैन्याला युक्रेनमधील जमिनीवर फारसे यश मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे रशियाकडून आता वेगळे मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न होईल. रशियाकडून मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होण्याचा धोका आहे. युक्रेनमधील सैन्य मोहिमेलाही गती देण्यासाठी आता मित्र देशांच्या सैन्याची मदत घेण्याचा विचारही पुतीन विचार करीत आहेत, असेही गुप्तचर विभागाने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT