Russia-Ukraine War Sarkarnama
देश

युक्रेन गुडघे टेकवणार? धुमश्चक्रीनंतर रशियानं दिला प्रस्ताव

रशियाने युक्रेनविरूध्द युध्द पुकारल्यानंतर अमेरिकेसह अन्य देशांनी काढता पाय घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव : रशियाने युक्रेनविरूध्द युध्द (Russia-Ukraine War) पुकारल्यानंतर अमेरिकेसह अन्य देशांनी काढता पाय घेतला आहे. या युध्दात युक्रेनला (Ukraine) थेट मदत न करता रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे या लढाईत युक्रेन एकटा पडला असून आता एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत आहे. रशियानेही चर्चेचा प्रस्ताव पुढे केला असल्याने आशेचा किरण दिसून लागला आहे.

रशियाने (Russia) शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीवला वेढा घातल्याचे वृत्त आहे. अनेक लष्करी तळ उद्धस्त केले असून विमानतळांनाही लक्ष्य केलं आहे. युक्रेनचं लष्करही तोडीस तोड उत्तर देत असल्याने संघर्ष अधिक पेटला आहे. रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले केले जात असून अनेक गावांमध्ये रणगाडे घुसले आहेत. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. तसेच रशियाचे सुमारे एक हजार सैन्यही मारले गेल्याचे युक्रेननं म्हटलं आहे.

एकीकडे हल्ल्याची तीव्रता वाढत असताना रशियाकडून युक्रेनला मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. युक्रेनच्या सैन्याने माघार घेतल्यास पुन्हा चर्चा सुरू केली जाईल, असे विदेश मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींनीही पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला आहे. रशियाकडून शिष्टमंडळ पाठवले जाऊ शकते. पण युक्रेनकडून एवढ्या लवकर गुडघे टेकवले जाणार नाहीत, असंही वृत्त आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (joe Biden) यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री (ता. 24 फेब्रुवारी ) जी-७ देशांच्या (G-7) नेत्यांशी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल चर्चा केली. त्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन नव्या निर्बंधांची घोषणा केली. बायडेन म्हणाले, "संपूर्ण जग रशियाच्या विरुद्ध एकवटले आहे. युरोपिय समुदायातील ३० पैकी २७ देश आणि जी-७ राष्ट्रे रशियाविरुद्ध एकत्रितपणे निर्बंध लागू करणार आहेत.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करण्यात येणार नाही. आधीचा सोव्हिएट रशिया त्यांना पुन्हा निर्माण करायचा आहे. त्यांची ही महत्त्वाकांक्षा इतर देशांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असेही बायडेन म्हणाले. भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील सहकारी आहे. रशिया-युक्रेन यांच्या युद्धात भारत अमेरिकेला साथ देणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत बायडेन यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, "आम्ही भारताच्या संपर्कात असून, याबाबतची चर्चा अद्याप झालेली नाही, असे उत्तर बायडेन यांनी दिले. (Russia-Ukraine War News updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT