Russian Shops To Limit Food Sales  Sarkarnama
देश

पुतीन यांना युध्द महागात; आपल्याच देशातील नागरिकांवर निर्बंध लादण्याची वेळ

रशिया आणि युक्रेन युध्दाच्या अकराव्या दिवशीही जोरदार हल्ला सुरूच आहे.

सरकारनामा ब्युरो

मॉस्को : रशिया आणि युक्रेन युध्दाच्या (Russia Ukraine War) अकराव्या दिवशीही जोरदार हल्ला सुरूच आहे. यादरम्यान रशियातून मोठं वृत्त आलं आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियातील आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. बँकांचे कामकाज प्रभावि झाले असून एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच आता नागिरकांना खाद्यपदार्थ किंवा इतर संबंधित वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

रशियाने (Russia) दुकानांमध्ये वस्तू खरेदी करण्याबाबतची सीमा निश्चित केली आहे. खाद्यान्नाचा काळबाजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक व्यक्तीने किती फूड पॅकेट घ्यावेत, हे निश्चित करण्यात आले आहे. मागील काही आठवड्यात अनेकांनी खाद्यान्नाची मोठी खरेदी केल्याचे आढळून आल्याची माहिती रशियाच्या उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली.

रशियातील उद्योग व कृषी मंत्रालयाने या निर्णयाचे समर्थन केलं आहे. रशियामध्ये अत्यावश्य़क खाद्यान्नाच्या किंमत सरकार ठरवते. त्यामध्ये ब्रेड, तांदूळ, पीठ, अंडी, काही मांसाहारी व दुधाशी संबंधित पदार्थांचा समावेश आहे. इतर देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाला हे पाऊल उचलावे लागले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी इतर देशांनी टाकलेल्या निर्बंधांवर टीका केली आहे. हे निर्बंध म्हणजे एकप्रकारे युध्दाची घोषणा केल्यासारखेच आहे, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, रशियाने हे युध्द थांबवावे, असं आवाहन जगातील बहुतेक देशांनी केलं आहे. पण पुतिन मागे हटण्यास तयार नसल्याने अमेरिकेसह (America) अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच उद्योग, खेळ आदी क्षेत्रांमध्येही विविध संघटना, कंपन्या रशियाशी नातं तोडत आहे. त्यामुळे रशिया एकटा पडू लागल्याचे चित्र आहे. याचा राग रशियाने युक्रेनवर काढण्यास सुरूवात केली आहे. पुतीन यांनी युक्रेनला अस्तित्वावरूनच धमकी दिली आहे.

आतापर्यंत रशियाने अनेक शहरांवर कब्जा मिळवला आहे. रशियन फौजा आता राजधानी कीवच्या (Kyiv) जवळ पोहचल्या आहेत. या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा जीव गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. तसेच 10 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचेही युक्रेननं म्हटलं आहे. पण या युध्दामुळे जगातील अनेक देशांनी रशियाच्या नाड्या आवळल्या आहेत. अमेरिकेतील दिग्गज कंपनी असलेल्या व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपनीनी रशियातील काम थांबवले आहे. त्याआधी अमेरिकेसह इतर देशांनी रशियावर अनेक कडक निर्बंध लादले आहेत. युध्द थांबवले नाही तर अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अनेक देशांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT