Akhilesh Yadav and Azam Khan
Akhilesh Yadav and Azam Khan Sarkarnama
देश

राजकीय घडामोडींना वेग; अखिलेश यांच्यापाठोपाठ आझम खान यांचाही राजीनामा

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असले तरी अद्याप शपथविधी झालेला नाही. तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातील (Samajwadi Party) घडामोडी वाढल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि त्यांच्या पाठोपाठ पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला. (Akhilesh Yadav And Azam Khan Resigns From Lok Sabha News)

विधानसभा निवडणुकीत आझम खान हे रामपूर मतदारसंघातून सुमारे ५५ हजार मताधिक्याने निवडून आले आहेत. सध्या ते रामपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. निवडणुकीआधी आझम खान यांच्यावर जल निगम भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

आता अखिलेश यांच्या पाठोपाठ खान यांनी खासदारकीवर पाणी सोडत विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश आणि खान या दोघांनीही एकाच दिवशी खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. अखिलेश हे करहल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांना जवळपास दीड लाख मतं मिळाली. भाजप उमेदवाराला त्यांनी सुमारे ६७ हजार मतांनी पराभूत केलं आहे. अखिलेश हे निवडून आले असले तरी राज्यात सत्ता न मिळाली नाही. ते आझमगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही करत होते.

यूपीमध्ये भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला. तर सपा आघाडीला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशचे निकाल पाहिले तर भाजपला एकट्या अखिलेश यादव यांनीच टक्कर दिल्याचे दिसते. इतर पक्षांना मागील निवडणुकीतील जागाही टिकवता आलेल्या नाहीत. या निवडणुकीत एनडीएच्या 39 जागा कमी मिळाल्या आहेत. सपाला मागील निवडणुकीच्या तुलनेत तीनपट वाढ झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व बसपाची धुळधाण झाली आहे. बसपला केवळ एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सपाचे विधीमंडळात अखिलेश हेच नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपला राज्यात टक्कर देण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. आता खासदारकी सोडून राज्यात योगींना टक्कर देण्यासाठी त्यांनी राज्यातच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

दरम्यान, निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना अखिलेश यांनी ट्विट केलं होतं. आमच्या जागांमधील अडीच पट तर मतांमध्ये दीड पट वाढ झाली आहे. आम्ही दाखवून दिले की, भाजपच्या जागा कमी करू शकतो. हे यापुढे सुरू राहील. भाजपकडून पसरवलेला भ्रम अर्ध्याहून अधिक कमी झाला असून बाकी काही दिवसांत कमी होईल. जनहितासाठी संघर्ष सुरूच राहील, असं अखिलेश यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT