कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत येत्या जून महिन्यामध्ये संपत आहे. मात्र पक्षीय चौकटीत न अडकल्याने भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार यावरुन चर्चा सुरु असतानाच आजच्या त्यांनी लिहिलेल्या फेसबूक पोस्टमधून या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. यातून ते भाजप सोडणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sambhaji Raje News)
नेमके काय म्हटले आहे संभाजीराजे छत्रपती यांनी?
आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिवछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे. छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे.
माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील! माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची.....
२०१६ मध्ये झाली होती खासदार म्हणून नियुक्ती :
११ जून २०१६ ला केंद्र सरकारच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संभाजीराजे छत्रपती यांची खासदार म्हणून नियुक्ती केली. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना हा बहुमान दिला. मात्र या काळात ते कधीही पक्षीय चौकटीत अडकले नाहीत किंवा कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत.
आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली असली तरीही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. अशातच मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय आणि मराठा समाजात त्यांच्याबद्दल असलेली क्रेझ यामुळे दोन्हीही काँग्रेस त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येतं आहे. याशिवाय त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.