Sanjay Raut News Sarkarnama
देश

Sanjay Raut News : 'भुजबळांच्या मुखातून फडणवीस बोलतात, राजीनाम्याचं केवळ नाटक'; राऊतांचा खरमरीत टोला!

Sanjay Raut On Chhagan Bhujbal Resign : "दोघांचीही मिलीभगत आहे. "

Chetan Zadpe

Mumbai News : मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार असल्याचे सांगत, 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबड येथील 17 नोव्हेंबरच्या ओबीसींच्या रॅलीत गेलो होतो, असा मोठा गौप्यस्फोट करत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली होती. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोंडसुख घेत भुजबळांना लक्ष्य केले आहे, भुजबळांच्या मुखातून फडणवीस बोलत असतात, त्यांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On Chhagan Bhujbal Resign)

संजय राऊत म्हणाले, "छगन भुजबळांनी राजीनामा देणं चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मंत्रिमंडळात काम करायचं नाही. तुम्हाला ओबीसींसाठी काम करायचं आहे. मात्र तुमचा राजीनामा मंजूर केला जात नाही, कारण हे दोघांचीही मिलीभगत आहे. राजीमानाम्याचं केवळ नाटक सुरू आहे. भुजबळांच्या मुखातून फडणवीसच बोलत असतात, असं लोकांना वाटतं. म्हणून त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर कुणी भूमिका घेत असेल तर त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बरखास्त केलं पाहिजे. मात्र शिंदे- फडणवीस-भुजबळ यांचं राजीनाम्याचं नाटक सुरु आहे, अशा शब्दात त्यांनी राजीनामा प्रकरणी सरकारला लक्ष्य केले आहे.

भुजबळांनी राजीनामा कधी दिला?

ओबीसी समाजासाठी आपली शेटपर्यंत लढाई सुरु राहणार, मी 16 नोव्हेंबरलाच माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबड येथील 17 नोव्हेंबरच्या ओबीसींच्या रॅलीत गेलो होतो, असा मोठा गौप्यस्फोट ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नगरमधील एल्गार मेळाव्यात केला होता. मात्र हा राजीनामा अद्यापपर्यंत स्वीकारण्यात आलेला नाही.

भुजबळांवर सरकार समर्थक आमदारांची आगपाखड -

सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधी भूमिका घेता, मग सरकारमध्ये का राहता? असा विचारणा भुजबळांना अनेकांकडून केली जात होती. भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी ही सरकारमधील काही आमदारांनी केली होती. या टिकेवर भुजबळांनी आपण केव्हाच राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे, भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT