seven deaths reported in uk from blood clots after astrazeneca shot
seven deaths reported in uk from blood clots after astrazeneca shot 
देश

धक्कादायक : कोरोना लस घेतल्यानंतर ब्रिटनमध्ये सात जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर जगभरातील अनेक देश करीत आहेत. या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. या लशीमुळे युरोपातील काही देशांमध्ये रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार आढळले आहेत. ब्रिटनमध्ये 30 जणांना लस घेतल्यानंतर या प्रकारचा त्रास झाला होता आणि त्यातील सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

ब्रिटन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचे 24 मार्चपर्यंत 1.81 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत त्यातील एकूण २५ जणांना रक्तात गुठळ्या होण्याचा त्रास झाला आहे. याआधी 18 मार्चपर्यंत 1.1 कोटी जणांना डोस देण्यात आला होता आणि त्यातील 5 जणांना त्रास झाला होता. अॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या एकूण ३० जणांना अशा प्रकारचा त्रास झाला होता आणि त्यातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

कॅनडात लस फक्त ५५ वर्षांवरील व्यक्तींना 
कॅनडा सरकारने काही दिवसांपूर्वी 55 वर्षांखालील व्यक्तींना ही लस देणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडातील राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीने म्हटले आहे की, या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे समोर आले आहे. परंतु, किती प्रमाणात हे दुष्परिणाम दिसत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, रक्ताच्या गुठळ्या निर्माण झालेल्यांपैकी 40 टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. याचमुळे 55 वर्षांखालील व्यक्तींना ही लस देण्याचे कोणते फायदे होत आहेत याबद्दल अनिश्चितता आहे.

युरोपीय देशांनीही घातले होते निर्बंध 
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर काही दिवसांपूर्वी थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे समोर आले होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए)  तपासणी सुरू होती. 

अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने (ईएमए) नुकतीच केली होती. आता ईएमए याबाबतचा सुधारित अहवाल 7 एप्रिलला जाहीर करणार आहे. जागतिक आरोग्य संघटननेनही (डब्लूएचओ) ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. तरीही आता ही लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार समोर येऊ लागल्याने अनेक देशांनी सावध भूमिका घेतली आहे. नेदरलॅंड आणि जर्मनीने अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा वापर 60 वर्षांखालील व्यक्तींसाठी तात्पुरता थांबवला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT