अहमदाबाद : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून, यात 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यात आधीच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे भाजपचे अनेक बडे नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला (Shankarsinh Vaghela) यांनी ट्विटबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे.
मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले अनेक बडे नेते नाराज आहेत. यावर मोदींचे विरोधक व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेल यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजचे राजकारण हे महाभारतापेक्षा कमी नाही. मूल्ये आणि स्वाभिमान यांच्यावर संकट आल्यास आपल्याच परिवारातील कौरवांसोबत लढणे हात योग्य धर्म आणि कर्म आहे. हे धर्मयुद्ध केवळ आपल्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी नसून, संपूर्ण राज्याच्या कल्याणासाठी आहे. अशी परिस्थिती येईल त्यावेळी 'अर्जुना'ला निसंकोचपणे युद्ध करावे लागेल.
वाघेला यांच्या ट्विटमधील अर्जुन हे नितीन पटेल असल्याचे मानले जात आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री बनल्याने आधीचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची खुर्ची गेली आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला नितीन पटेल हे उपस्थित होते. पंरतु, त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपू शकली नाही.
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 24 मंत्री आहेत. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे आधीच्या सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेषकरून स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पावले उचलत सर्व नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.