NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News Sarkarnama
देश

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांनी रणनिती बदलली; पवारांच्या नकारामुळे एकजूटीचे आव्हान

Mamata Banerjee | Sharad Pawar | NCP | Presidential election : शरद पवार यांचा राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला असून पुढील आणखी काही वर्ष ते निवडणुकीच्या राजकारणातच सक्रिय राहणार असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर दिली. मात्र शरद पवार जर तयार असतील तर आम्हीही सर्व तयार असल्याचे सांगत त्यांनी अजून पवार यांच्या नावाला विरोधी पक्षांचा पाठिंबा कायम असल्याचे बॅनर्जी यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.(Presidential election of india latest news)

ममता बॅनर्जी यांनी देशातील राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानुसार नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकूण १७ विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ममता बॅनर्जी बोलत होत्या.

जेष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सर्व विरोधी पक्षांनी आजच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचा उमेदवार देण्याचा ठराव मंजूर केला आहे. संविधानाचे संरक्षण करु शकणारा आणि मोदी सरकारला भारताच्या लोकशाहीचे अवमूल्यन रोखण्याची क्षमता असणारा उमेदवार असावा असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे, त्यानुसार आम्ही सर्वजण चर्चा करु आणि पुढे जावू, असेही ठरवण्यात आले असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. (Presidential election of india latest news)

गोपालकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांचे नाव चर्चेत

जवळपास सर्वच विरोधी पक्षांची शरद पवार यांच्या नावावर सहमती होती. मात्र त्यांनी उमेदवार होण्यास नकार दिला असल्याने आता विरोधी पक्षांच्या बैठकीत गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू गोपाल कृष्ण गांधी (Gopal Krishna Gandhi) यांचं नाव सुचवलं आहे. पण गोपाल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. मात्र पवारांच्या नकारामुळे सुचवलेल्या नवीन नावावर सर्वांचे कितपत एकमत करण्याचे आव्हान विरोधकांपुढे असणार आहे.

डाव्या पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली त्यावेळी गोपाल कृष्ण गांधी यांना राष्ट्रपती करण्यासाठीची चर्चा झाली. पवारांनीही डाव्या पक्षांनी सुचवलेल्या या नावाला विरोध केला नाही. २०१७ मध्ये गोपाल कृष्ण गांधी हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण, भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला. आता राष्ट्रपती पदाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोपाल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी त्यांना विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची विनंती केली. गोपाल कृष्ण गांधी हे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. शिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT