BJP latest news : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना मागील आठवड्यात केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारवर मागील १२ वर्षांत पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढविली. या राजीनाम्याचे पडसाद अजूनही देशभरात उमटत आहेत. त्यानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. विरोधकांची बोलती बंद करणारे भाजपचे फायरब्रँड प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
शहजाद पुनावाला यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे आपला राजीनामा पाठविल्याचे वृत्त 'न्यूज १८'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पुनावाला यांनी गुरूवारी रात्री आपल्या 'एक्स' हँडलवरील राष्ट्रीय प्रवक्ता तसेच भाजपचा उल्लेख हटविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन समर्थक, केवळ एवढाच उल्लेख नव्याने करण्यात आला आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर अजूनही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असा उल्लेख आहे.
'न्यूज १८'च्या वृत्तानुसार, शहजाद पुनावाला यांच्याकडून लवकरच राजीनाम्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल. पुनावाला यांची पक्षाला सोडचिठ्ठी देणे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, देशातील भाजपच्या प्रवक्त्यांपैकी पुनावाला हे विरोधकांवर तुटून पडणारे आक्रमक नेते मानले जात होते. सोशल मीडियातही ते सतत सक्रीय असायचे.
पुनावाला हे व्यवसायाने वकील असून काँग्रेसमधून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली होती. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतरच त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या काळात त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसवर सातत्याने टीकास्त्र सोडले. त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे विरोधकांचे मुद्दे खोडून काढत पक्षाची आणि सरकारची धोरणे ठामपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यानही त्यांनी सरकारची बाजू जोरकसपणे मांडली होती. मात्र, आता त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.