MP Sukhdev Singh Dhindsa

 

Sarkarnama

देश

ते मोदींशेजारी बसणार होते पण रस्त्यात असतानाच रिपोर्ट आला अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाबच्या दौऱ्यावर असून विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज पंजाबच्या (Punjab) दौऱ्यावर असून विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमातून ते पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) रणशिंग फुंकणार असल्याचे मानले जाते. त्यासाठी भाजपसह त्यांचा मित्र पक्ष असलेला शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनीही जोरदार तयारी केली आहे.

पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतपधानांची दुपारी एक वाजता सभा होणार आहे. मागील काही दिवसांपासून पंजाबमधील कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी तसेच सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला असून गर्दीत न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या वातावरणात पंतप्रधानांची सभा होणार आहे. त्यासाठी शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग धिंडसा (Sukhdev Singh Dhindsa) हेही सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा पक्ष भाजपचा सहकारी असल्याने त्यांना पंतप्रधानांशेजारीच जागा मिळणे अपेक्षित होते. पण रस्त्यात असतानाच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना अर्ध्या रस्त्यातूनच परतावे लागल्याची माहिती धिंडसा यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधील फिरोजपूर येथे भेट देणार आहेत. दुपारी 1 वाजता तेथील 42,750 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची कोनशीला ठेवणार आहेत. या प्रकल्पांमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग, अमृतसर-उना टप्प्याचे चौपदरीकरण, मुकेरीयन-तलवारा दरम्यान नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, फिरोजपूर येथे पीजीआय सॅटेलाईट केंद्र उभारणी तसेच कपूरथला आणि होशियारपूर यथे दोन वैद्यकीय विद्यापीठांची स्थापना करण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

देशाच्या सर्व भागांमध्ये संपर्क सुविधा सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या अखंडीत प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये विविध राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. परिणामी, पंजाब राज्यात 2014 साली 1700 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते त्यात दुपटीने वाढ होऊन 2021 साली राज्यात 4100 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. याच प्रयत्नांचा पुढील भाग म्हणून, पंजाबमधील दोन प्रमुख रस्ते मार्गिकांच्या कामाची कोनशीला ठेवली जाणार आहे. या कामांमुळे, पंजाबमधील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर पोहोचण्याच्या सुलभतेत वाढ करण्याची पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT