Devendra Fadnavis Sarkarnama
देश

`शिवसेनेची लढाई ही त्यांच्या उमेदवारांचे डिपाॅझिट वाचविण्यासाठी`

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) शिवसेना रंग भरण्याची चिन्हे

सरकारनामा ब्यूरो

पणजी : राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shivsena) हे गोव्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याने तेथील सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. (Goa Assembly Election) या आघाडीत काॅंग्रेसलाही सहभागी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या महाविकास आघाडीवर तेथील भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे जनमताची चोरी होऊ देणार नाही, असे आव्हान दिले आहे.

गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला 21 ते 24 जागा मिळवून बहुमत मिळण्याचा अंदाज काही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेनेने नऊ जागांवर लढण्याचे जाहीर केले. या साऱ्या घडामोडींवर बोलताना फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला. गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत आणि एका तरी जागेवर अनामत रक्कम वाचावी यासाठी आहे, अशा शब्दांत खिल्ली उडविली.

``काँग्रेस खूप हुशार पक्ष आहे. ते गोव्यात सगळ्यांना सोबत घेतील पण शिवसेनेला सोबत घेणार नाही. महाराष्ट्रात ते शिवसेनेसोबत असतील पण त्यांना हे माहिती आहे की गोव्यात शिवसेनेला सोबत घेतल्यास आपल्या अल्पसंख्यांकाच्या मतपेटीला धक्का बसेल. त्यामुळे ते शिवसेनेला सोबत घेणार नाहीत’,`` असाही दावा फडणवीस यांनी केला आहे.

गोव्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून पक्षांतरेही रोज घडत आहेत. भाजपच्या चार आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत ही मंडळी स्वार्थासाठी पक्ष सोडत असल्याची टीका केली.

गोव्यात भाजप, आप, काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मगोप असे अनेक पक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे येथील लढत बहुरंगी होणार आहे. फडणवीस यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने जबाबदारी दिली आहे. पुढील चार दिवस ते गोव्यात ठाण मांडणार आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे, असेही शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

संजय राऊत यांनी गोव्यात सत्ता परिवर्तन होण्याचा दावा करत भाजपची सत्ता येण्याचे सांगणारे ओपिनिअन पोल म्हणजे अफवा पसरविण्याचा उद्योग असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT