Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News Sarkarnama
देश

Shiv Sena : शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार; आता थेट बिर्लांना देणार आव्हान

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक खासदारांच्या वेगळ्या गटाला मान्यता देण्याच्या तसेच राहुल शेवाळे यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. लोकसभा अध्यक्ष व सचिवालयाने आम्हाला नैसर्गिक न्याय न देता अन्याय केल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे. त्यामुळे या निवडीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. (Shiv Sena Latest Marathi News)

नवी दिल्लीत गुरूवारी माध्यमांशी बोलताना राऊतांनी (Vinayak Raut) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, गटनेता निवडण्याचे पूर्ण अधिकार त्या-त्या पक्षाच्या प्रमुखांना आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्याअनुषंगाने याचिका दाखल आहेत. अशा अवस्थेत अत्यंत घाईने गटनेतेपदावर दावा सांगण्यात आला. पण लोकसभा सचिवालयाने आणची बाजू ऐकून घेण्याची आवश्यकता होती. आमच्या तिन्ही पत्रांची दखल घेतली नाही, त्याला उत्तर दिले नाही. हा एकतर्फी निर्णय घेत शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केला आहे.

लोकसभा सचिवालयाने एवढं मोठं औदार्य कसं दाखवलं, याचा शोध आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून घ्यावा लागणार आहे. आम्हाला नैसर्गिक न्याय मिळायला हवं होतं. लोकसभा अध्यक्षांचं हे कर्तव्य होतं. संसदीय गटाचा गटनेता नियुक्त करण्याचा अधिकार हा त्या पक्षाच्या प्रमुखांना असतो. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार गटनेते नियुक्त झालेले असतात, सदस्यसंख्येवर होत नाहीत, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

आम्ही 6 जुलै रोजी भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवल्याचे पत्र लोकसभा सचिवालयाला दिले होते. त्यावेळी ह्यांच्या गटाचीही स्थापना झाली नव्हती. संसदीय कामकाज मंत्रालयालाही हे पत्र दिलं. हे पत्र लोकसभा अध्यक्षांनी वाचलंच नाही, हे या देशाचं दुर्दैव समजायचं का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

माझी नियुक्ती झाली त्यावेळी पक्षप्रमुखांचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. ते पत्र त्यांनी स्वीकारून माझी नियुक्ती केली होती. पण आता ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली नाही, असा दावा राऊतांनी केला आहे. आम्ही 18 जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन गटनेते पदावर दावा सांगण्यात आला तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. 19 जुलै रोजीही त्यांना भेटून पत्र दिलं.

लोकसभेच्या पोर्टलवर 20 तारखेला शेवाळे यांच्या गटनेतापदी नियुक्तीचे पत्र आलं आहे. पण आम्हाला 19 तारखेला हे पत्र मिळालं. तर प्रत्यक्षात पक्षाच्या स्थितीबाबतची लोकसभेतील यादी 18 जुलै रोजीची आहे. त्यात शेवाळे हे गटनेता असल्याचे म्हटलं आहे. याचा अर्थ त्यांनी आधीच निर्णय घेऊन ठेवला होता, असा आरोप राऊतांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT