Kashi Vishwanath Temple-Gyanvapi Mosque complex
Kashi Vishwanath Temple-Gyanvapi Mosque complex Sarkarnama
देश

काशीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलं शिवलिंग; जागा तातडीनं सील

सरकारनामा ब्युरो

वाराणसी : येथील ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) वास्तूमध्ये शिवलिंग सापडलं आहे. यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा परिसर तातडीनं सील करण्याचे निर्देश दिले आहेत. हे शिवलिंग सापडलं आहे, ती जागा तातडीने सील करावी आणि त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने पोलीस आयुक्त (Police) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) प्रमुखांना दिले आहेत. या जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे आज सलग तिसऱ्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आली. ही सर्वेक्षणाची प्रक्रिया प्रामुख्याने सकाळी आठ वाजता सुरू झाली आणि ती सव्वादहा वाजेपर्यंत सुरू होती. या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेवर सर्वच पक्षकारांनी समाधान व्यक्त केल्याचे वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज यांनी सांगितले. मागील आठवड्यामध्ये मशीद समितीने या सर्वेक्षणाला आक्षेप घेतला होता. अखेर सत्र न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकली होती.

मशिदीच्या वास्तूमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला असून, मुस्लिम पक्षकारांनी याचं खंडन केलं आहे. न्यायालयामध्ये उद्या (ता.१७) हा अहवाल सादर करण्यात येईल. हिंदू पक्षकारांपैकी एक असलेले डॉ. सोहनलाल यांनी मशिदीच्या परिसरात खोदकाम करताना अपेक्षेपेक्षाही बरेच काही हाती लागल्याचे म्हटले आहे. मशिदीच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ ७५ फूट लांब, ३० फूट रुंद आणि १५ फूट उंच ढिगारा असून, त्याच्या सर्वेक्षणाची मागणीही न्यायालयात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मशिदीतील सर्वेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर उद्या (ता.१७) सुनावणी होणार आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. सत्र न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून ज्ञानवापीच्या परिसरामध्ये सर्वेक्षण केले जावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. अंजुमन इंतेजामिया मशीद समितीकडून याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT