Sanjay Raut | Shivsena | Anil Desai  Sarkarnama
देश

संजय राऊतांच्या अटकेविरोधात अनिल देसाईंनी लढवला किल्ला; सभागृह केले ठप्प

Sanjay Raut | Shivsena | Anil Desai : राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांची मात्र अनिल देसाई यांना तंबी

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत नव्या आठवड्याचीही सुरवात प्रचंड गोंधळाने झाली. राज्यसभेत शिवसेनेचे (Shivsena) खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी राऊतांच्या अटकेविरोधात किल्ला लढविला. त्यांच्या या लढ्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांचीही साथ मिळाली. मात्र राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी देसाईंना थांबवत राऊत यांच्या अटकेचा सभागृहाशी काहीही संबंध नाही. ते प्रकरण इथे काढू नका. बाहेरचे स्कोर सेटल करण्यासाठी या सदनाचा वापर करू नका, अशी तंबी दिली.

राऊत यांच्या अटकेचे प्रकरण, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचे मनी लॉंड्रिंगचे प्रकरण यावरून विरोधक सध्या प्रचंड संतप्त आहेत. मोदी सरकार विरोधकांवर सूडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आज पुन्हा संसद दणाणून सोडली. अनिल देसाई यांनी आज सुरवातीपासूनच रूद्रावतार धारण केला होता. नायडू यांनी त्यांना चार वेळा तंबी दिली. तुमचे बाहेरचे वाद आणि सदनाचा काहीही संबंध नाही. बाहेरची प्रकरणे येथे आणू नका. मात्र नायडू यांचे हे सांगणे विरोधकांनी जुमानले नाही. त्यामुळे सकाळी ११ ला सुरू झालेले कामकाज अवघ्या २ मिनीटांत गुंडाळण्यात आले. नंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पुन्हा दुपारी दोनपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

यादरम्यान गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास काही काळ चालविण्यात आला. अशातच कधीही वेलमध्ये न येणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदारही आज वेलमध्ये उतरले होते. दरम्यान काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले की भाजपला विरोधकमुक्त संसद हवी आहे. त्यासाठीच जे जे बोलतात त्या विरोधी पक्षनेत्यांविरूध्दची प्रकरणे बाहेर काढून त्यांना त्रास दिला जात आहे. संजय राऊत कायदेशीर लढाई लढतील. एखादा प्रॉपर्टीचा मुद्दा असेल तर त्यासाठी कायदा आहे. पण राऊत यांची ईडीकडून १६ तास चौकशी करण्यात आली व नंतर त्यांना अटक केली. हा निव्वळ विरोधकांचा छळ सुरू आहे.

शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही राऊत यांच्या अटकेविरोधात संसदेत आवाज उठविणे आम्ही चालू ठेवू असे सांगितले. भाजप संसदेत व संसदेबाहेर विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विरोधक झुकणार नाहीत व या दबावतंत्राला बळीही पडणार नाहीत. राज्यसभेच्या एका ज्येष्ठ खासदारांवरील अटकेच्या या अन्याय् कारवाईच्या विरोधात आपण नायडू यांना हस्तक्षेपाची विनंती करू व त्यासाठी पत्र लिहून दाद मागू असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे स्क्रिप्ट वाचून दाखवतात, राज्यपाल दिवसरात्र काहीही बरळत असतात आणि भाजपविरोधात बोलणाऱयांचा आवाज त्यांना तुरूंगात टाकून बंद केला जातो. देशातील लोकशाहीसाठी हे भयंकर वातावरण असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.

रमेश विरूध्द रमेश !

राज्यसभेत दुपारी साडेबाराच्या सुमारास कामकाज तहकूब झाले तोच कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सध्या भाजपचे आंध्र प्रदेशमधील खासदार सी एम रमेश यांच्या कथित अवैध संपत्तीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. जयराम रमेश यांनी आपला नामोल्लेख करताच भाजपचे रमेश इतके भडकले की ते धावतच जयराम यांच्या आसनाजवळ गेले. तेथे दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. जयराम रमेश यांनी, तुम्ही माझ्याशी बोलू नका, असे बजावताच रमेश आणखी चिडले. शेवटी कॉंग्रेसच्या इतर खासदारांनी मध्यस्ती करून दोघांना दूर केले. भाजप बाकांकडे जाता जाता सी एम रमेश यांनी पत्रकार कक्षाकडे पाहून, जयराम रमेश यांचे डोके फिरले आहे असे हावभाव केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT