Hadimani family Sarkarnama
देश

धक्कादायक : माजी सैनिकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

हादीमनी कुटुंबीय सधन आणि सुशिक्षित आहे. त्यांना पैशांची विवंचनाही नव्हती.

सरकारनामा ब्यूरो

संकेश्वर : वडिलांनी तीन मुली व मुलग्यासह विष प्राशन करून स्वतःही आत्महत्या केली. बोरगल (ता. हुक्केरी) येथे ही घटना शुक्रवारी (ता. २२ ऑक्टोबर) रात्री घडली. आज शनिवारी (ता. २३ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोपाळ दुंडाप्पा हादीमनी (वय ४६), सौम्या गोपाळ हादीमनी (वय १९), स्वाती गोपाळ हादीमनी (वय १६), साक्षी गोपाळ हादीमनी (वय १२) व सृजन गोपाळ हादीमनी (वय १०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. संकेश्वर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. (Shocking : Five members of a former soldier's family commit suicide)

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, गोपाळ हादीमनी माजी सैनिक होते. त्यांच्या पत्नीचे माहेर कणगले आहे. त्यांचे काही महिन्यांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले आहे. तेव्हापासून हादीमनी मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच संपूर्ण कुटुंबाने विषप्राशन केल्याने ही घटना घ़डल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांच्या नेतृत्त्वाखाली धाव घेऊन माहिती घेतली. मयत गोपाळ यांचा भाऊ गोविंद हादीमनी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. संकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह रात्री नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील पाच जणांनी एकाचवेळी आपले जीवन संपविल्यामुळे बोरगलमध्ये स्मशानशांतता आहे. शनिवारी दिवसभर याच घटनेची चर्चा तालुकाभर होती.

सुशिक्षित कुटुंबाकडून टोकाचे पाऊल

हादीमनी कुटुंबीय सधन आणि सुशिक्षित आहे. त्यांना पैशांची विवंचनाही नव्हती. घरची सहा एकर जमीन, ट्रॅक्टरही आहे. माजी सैनिक असल्याने गोपाळ हादीमनी यांना पेन्शनही होती. त्यांची मुलेही सुशिक्षित होती. या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याची चर्चा सुरू आहे.

पालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बोरगलमधील घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. वडिलांसह मुली व मुलग्याने विषप्राशन केल्याची घटना मन हेलावून सोडणारी आहे. कोणीही तणावाखाली येऊन असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी शोकसंदेशात केले आहे.

अनेकांकडून घटनेबाबत विचारणा

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची हुक्केरी तालुक्यातील पहिलीच मोठी घटना आहे. त्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर तशा पोस्ट व्हायरल होत होत्या. अनेकांकडून घटनेबाबत विचारणा करण्यात येत होती. तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातही याच घटनेची चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT