मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. ईडीने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठाणी याची 14 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या चार जणांमध्ये सिद्धार्थचा समावेश आहे. सिद्धार्थ याच्यावर सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धार्थ पीठाणी याचे वर्तन अतिशय संशयास्पद असल्याचा आरोप विकाससिंह यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तो अतिशय हुशार गुन्हेगार आहे. पाटण्यात एफआयआर दाखल होईपर्यंत तो सुशांतच्या कुटुंबीयांच्या सातत्याने संपर्कात होता. तसेच, तो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होता. पाटण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीला मदत करण्यास सुरुवात केली.
एफआयआर दाखल झाल्यानंतरचे त्याचे एकूण वर्तन संशयास्पद आहे. त्याने आरोपी रियाला ई-मेलही केले आहेत. या प्रकरणातील आरोपीला त्याने मदत केल्याने त्याचे तिच्याशी आधीपासून संगनमत होते हे दिसून येते. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याशिवाय या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही, असे विकाससिंह यांनी नमूद केले.
रिया चक्रवर्ती हिने पाटण्यातील एफआयआर मुंबईत वर्ग करावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्टला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र, बिहार आणि रिया चक्रवर्ती यांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.