SII ceo adar poonawalla clarifies about covid 19 vaccine covishield
SII ceo adar poonawalla clarifies about covid 19 vaccine covishield  
देश

अदर पूनावाला म्हणतात, 'सिरम'च्या कोव्हिशिल्ड लशीची किंमत योग्यच कारण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना सिरमकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लस राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यावर अखेर सिरमने खुलासा केला आहे. 

या वादावर पडदा टाकण्यासाठी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी खुलासा केला आहे. लशीच्या किमतीची कारणेही त्यांनी दिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील कोरोना लशीच्या किमतीची तुलना भारतातील किमतीशी करणे चुकीचे आहे. सुरवातीला लशीची किंमत अतिशय कमी ठेवली होती. कारण काही देशांनी लस उत्पादनासाठी आधीच निधी दिला होता. त्यामुळे भारतासह इतर देशांतील सरकारी लसीकरण कार्यक्रमांसाठी कोरोना लशीचा सुरवातील पुरवठा कमी किमतीने करण्यात आला. 

सध्याच्या संकटाच्या काळात कंपनीला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी लशीची किंमत योग्य नसेल तर कंपनीला तग धरता येणार नाही. तसेच, आमच्या लशीपैकी अतिशय कमी लशी खासगी रुग्णालयांना प्रतिडोस 600 रुपये दराने दिल्या जाणार आहेत. कोरोनावर संसर्गावरील उपचार आणि अत्यावश्यक वस्तूंची किंमत पाहता लशीची किंमत अतिशय कमी आहे, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले.  

याआधी पूनावाला यांनी म्हटले होते की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले 50 टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे.  

कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना 400 रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. पुढील 4 ते 5 महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले होते. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT